गोंदिया : सध्या श्रावण महिना सुरू असून सोमवारी मंदिरात नेहमीच्या तुलनेत भाविकांची लांब रांग असल्याचे पाहायला मिळते. मात्र, आमगाव तालुक्यातील एका मंदिरात गावकऱ्यांनी वेगळ्याच कारणासाठी गर्दी केलीये. गावकऱ्यांची अपार श्रद्धा असल्येल्या या मंदिरात दगडाचा नंदी चक्क पाणी पित असल्याची वार्ता वाऱ्याच्या वेगाने पसरली अन् दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली.
कवडी गावातील साखरीटोलापासून २ किमीवर असलेल्या पिंपळाच्या वृक्षाखाली असलेल्या महादेवाच्या मंदिरात हा प्रकार घडलाय. या मंदिरात भगवान शंकराची दगडापासून बनवलेली पिंड व सोबत दगडाचे दोन नंदी असून बाजूलाच दुर्गादेवीची मुर्ती आहे. यातील दोनपैकी एक नंदी चक्क पाणी पित असल्याची बातमी हा हा म्हणता परिसरात पसरली. अन् हा दैवी चमत्कार असल्याची भावना मनात ठेवत भाविकांनी मंदिराकडे धाव घेतली. जो-तो तांब्यात पाणी व लहान चमचा घेऊन मंदिराकडे धाव घेऊ लागला. काहींनी चमच्याने नंदीला पाणी पाजून पाहिले व हा चमत्कार पाहायला मंदिरात चांगलीच गर्दी उसळली. या घटनेने गणपती दूध पितो, गणपतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याच्या जुन्या घटनांची आठवण ताजी झाली. आता हा खरचं चमत्कार आहे की काय हे सांगायला काही स्पष्ट प्रमाण नाही. कारण याआधीही अशा प्रकारच्या अनेक घटना व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे, यामागचे शास्त्रीय कारण काय याचा शोध घेतल्यानंतर नेमका प्रकार निदर्शनास येईल. मात्र, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
आश्चर्च! महादेवाचा नंदी पितोय चक्क पाणी?; मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
RELATED ARTICLES