Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedगोंदिया: ‘कातुर्ली वॉरियर्स’ गाव विकासाचा रोल मॉडेल, सैनिक संघाच्या सैनिक प्रवेशद्वाराचे लोकार्पण

गोंदिया: ‘कातुर्ली वॉरियर्स’ गाव विकासाचा रोल मॉडेल, सैनिक संघाच्या सैनिक प्रवेशद्वाराचे लोकार्पण

 

गोंदिया, ब्युरो. कातुर्ली गावातील ३५ सैनिकांनी एकत्र येत गावाला काही देणं लागते या भावनेतून स्वखर्चाने गावात सुसज्ज आणि भव्यदिव्य असे प्रवेशद्वार तयार केले. त्याला कातुर्ली वॉरियर्स असे नाव दिले. सैनिक संघाच्या वतीने गावात पुन्हा डिजीटल वाचनालय देखील तयार करण्यात येणार आहे. कातुर्ली वारियर्स सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. तालुका, जिल्हा नव्हे तर राज्यातील सैनिकांच्या गावांसाठी कातुर्ली येथील कातुर्ली वॉरियर्स सैनिक संघटना गाव विकासाचा रोल मॉडेल ठरेल, असा विश्वास आमदार सहेसराम कोरोटे यांनी व्यक्त केला.

आमगाव तालुक्यातील कातुर्ली येथील कातुर्ली वॉरियर्स सैनिक संघाच्या वतीने बांधकाम करण्यात आलेल्या कातुर्ली वॉरियर्स सैनिक प्रवेशद्वाराचे लोकार्पण भारतीय थलसेनेच्या स्थापना दिवस (आर्मी डे) चे औचित्य साधून रविवारी (ता. १५) पार पडले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, जि.प. गटनेते सुरेश हर्षे, समाजसेविका प्रा. सविता बेदरकर, सरपंच छगन बावनकर, सैनिक संघाचे अध्यक्ष प्रेमलाल पटले, माजी सरपंच चुन्नीलाल शहारे, गोपीचंद भेलावे, जसवंतराव बावनकर, केशरीचंद बिसेन, डॉ. सिताराम कोरे, भोजलाल जैतवार, नत्थुलाल कटरे, सुभाषचंद्र ठाकूर, प्रेमलाल बिसेन, विजय कोरे, चंद्रभान तरोणे, उपाध्यक्ष कुवरलाल बिसेन आदी उपस्थित होते. आमगाव तालुक्यातील कातुर्ली या गावाने देशाला ३५ सैनिक दिले. त्या सैनिकांनी एकत्र येत गाव विकासाचे पाऊल उचलले आहे. प्रथमत: ४.५ लाख रुपये खर्चातून गावाच्या सुरुवातीला भव्य असे प्रवेशद्वार तयार केले असून त्याचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना आमदार कोरेटे पुढे म्हणाले, कातुर्ली येथील सैनिकांनी इतर गावांतील नोकरीत असलेल्यांसमोर एक आदर्श निर्माण करून दिला आहे. कातुर्ली हे गाव आज तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यातील एक आदर्श गाव म्हणून ओळखले जाणार आहे. कातुर्ली वॉरियर्सच्या या उपक्रमाला आपले सहकार्य नेहमी असणार आहे. डिजीटल वाचनालयासाठी त्यांनी ४ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा देखील यावेळी केली. त्याचप्रकारे कातुर्ली रायजिंग स्टार्सच्या करिष्मा मोहनकर हिने आमदार कोरेटे यांनी कातुर्ली ते आमगाव बस सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले. आमदार कोरेटे यांनी तातडीने आगार प्रमुखांशी बोलून लवकरच बस सुरू करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान नरेश माहेश्वरी यांनी देखील कातुर्ली वॉरियर्सच्या या उपक्रमांचे कौतूक करून आपण आणि आपला पक्ष सदैव मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकातून समितीचे कोषाध्यक्ष गणेश बिसेन यांनी सैनिक संघाच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम, भविष्यातील कार्यक्रम आणि थलसेना स्थापना दिवसासंदर्भात सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी गावातील भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कातुर्ली रायजिंग स्टार्सचे अमीत गौतम, सागर भेलावे, लक्ष्मी भेलावे, आशा चावके, करिष्मा मोहनकर यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच गावातील इयत्ता १० वी आणि १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. यशस्वितेकरिता मार्गदर्शक जैपाल चावके, मोसमी कटरे, दीपक कोरे, निळकंठ कुंभलकर, धनराज शहारे, भूमेश्वर फरकुंडे, कमलसिंह बरेले, सेवक मोहनकर, नायब सुबेदार लोकचंद कुंभलकर, दिपेश चावके, लखन चावके, नेहा कोरे, सपना पोंगळे, संध्या कोहळे, जितेंद्र कटरे, कुष्नकुमार कटरे यांच्यासह कातुर्ली वॉरियर्स सैनिक संघ, कातुर्ली रायजिंग स्टार्स आणि गावकऱ्यांनी सहकार्य केले.

रक्तदानातून शहिदांना श्रद्धांजली

कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने करण्यात आली. देशाच्या संरक्षणाकरिता ज्या हुतात्मांनी प्राणाची आहुती दिली. त्या वीर जवानांना श्रद्धांजली म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शासकीय रक्तपेढी गोंदियाच्या पथकाने रक्तसंकलन केले. याप्रसंगी गावातील तरूणांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.

भारतीय थल सेनेच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे गावकऱ्यांना आकर्षण लागले होते. सकाळपासूनच गावातील वातावरण अगदी देशभक्तीमय झाले होते. गावात घरासमोर सडा, सारवण करण्यात आले. संघाचे सैनिक आपल्या गणवेशात वावरत होते. तर वॉरियर्सग्रुपशी संलग्नित असलेल्या रायजिंग स्टार्सने देखील एकाच रंगाचे कपडे परिधान करून अगदी शिस्तीत पाहुण्यांचे स्वागत केले.

रवि ठकरानी (प्रधान संपादक)
      93593 28219

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments