शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल जयंती समारोह 9 फेब्रुवारीला
गोंदिया : भंडारा जिल्ह्याचे स्वनाम धन्य नेता व शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या 118 व्या जयंती निमित्त भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील शालेय व पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार स्व. मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण पदक प्रदान करून सन्मानीत करण्याकरिता गोंदिया येथील स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात दि 9 फेब्रुवारी 2024 रोज शुक्रवारला दुपारी 3.00 वाजता भव्य सुवर्ण पदक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे आयोजित सुवर्णपदक वितरण सोहळ्यात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सुवर्ण पदक वितरण समारंभ कार्यक्रमाचे उदघाटक देशाचे उपराष्ट्रपती माननीय श्री जगदीप धनखडजी, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री रमेश बैसजी, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, श्री अजितदादा पवारजी, मंत्री माननीय श्री हसन मुश्रीफजी, पालकमंत्री गोंदिया माननीय श्री धर्मराव बाबा आत्रामजी कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. श्री प्रफुल पटेलजी व इतर मान्यवर अतिथी उपस्थित राहणार आहेत.
सुवर्णपदकाने सन्मानित विद्यार्थ्यांमध्ये एस.एस.सी. मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त गुजराती नॅशनल हायस्कूल, गोंदिया येथिल कु.संश्रुती सत्यशील चौहान, गोंदिया जिल्हा एस.एस.सी. मध्ये सर्वाधिक गुण कु.काजल जयपाल रुखमोडे. एच.एस.एस.सी. मध्ये एस.एम.पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक गुण प्राप्त कु. दिव्या ताकेश पहिरे, विवेक मंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथिल कु.पर्व अजय अग्रवाल व राज्यात व्दितीय क्रमांक प्राप्त एस.एम.पटेल कनिष्ठ महाविद्यालय येथिल लक्ष्य नीरज अग्रवाल, बी.ए.मध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक गुण प्राप्त एम.पी. महाविद्यालय देवरी येथील कु.अश्मिता सुरजलाल कोसरकर, बी.कॉम.मध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक गुण प्राप्त एन.एम.डी महाविद्यालयातील कु.मेघा सुशील चौरसिया, बीएससी मध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक गुण प्राप्त धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया येथिल कु. प्रियांशी महेशसिंग राठोड, तसेच भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळवले आहेत त्यात एस.एस.सी मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विकास हायस्कूल पवनी येथील कु. गार्गी विलास वैरागडे, एच.एस.सी मध्ये भंडारा जिल्हातील सर्वाधिक गुण प्राप्त नूतन गर्ल्स ज्युनियर कॉलेज, भंडारा येथून कु. नंदीनी संजय साठवणे, बी.ए.मध्ये भंडारा जिल्ह्यातून सर्वाधिक गुण जे. एम.पटेल महाविद्यालय, भंडारा येथील कु.मेघा विजय मित्रा, बी. कॉम मध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा येथील कु.साक्षी ताराचंद खंगार, बी.एस्सी. मध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या जे. एम.पटेल महाविद्यालय, भंडारा येथील कु. प्राची वामन लेंडे, बी.ई. मध्ये मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, शहापूर (भंडारा) येथील हेमंत देवेंद्र बघेले यांचा गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे. सुवर्णपदक वितरण समारंभात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्व.मनोहरभाई पटेल स्मृती समिती, श्री गुजराती राष्ट्रीय केलवाणी मंडळ, मनोहरभाई पटेल अकाडमी, गोंदिया शिक्षण संस्था यांच्या वतीने श्रीमती वर्षाताई पटेल, माजी आमदार हरिहरभाई पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले आहे.