गोंदिया। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागीय बैठकीच्या नागपूर येथील विभागीय रेल्वे कार्यालयात बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे हे या बैठकीचे सभापती होते. रेल्वेसंबधी असलेल्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, आवश्यक तिथे मंत्री स्तरावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे खासदार सुनील मेंढे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
वर्षातून एकदा रेल्वेच्या झोन निहाय बैठक घेतली जाते. बिलासपूर झोनची बैठक नागपूर विभागीय कार्यालयात घेण्यात आली. बैठकीला बिलासपूर झोन मध्ये येणाऱ्या लोकसभा क्षेत्रातील सर्व खासदार आणि या विभागीय महाव्यवस्थापक उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला सभापतींची निवड करण्यात आली. खासदार सुनील मेंढे यांना सभापती म्हणून मान मिळाला. या बैठकीत विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. दोन अंतर्गत नवीन लाईन टाकताना वन आणि इतर विभागाच्या येत असलेल्या अडचणी संदर्भात रेल्वे मंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. अतिरिक्त रेल्वे मार्गाचे काम या विभागातून केले जाते. हे काम संथ गतीने सुरू असून त्या संदर्भात रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
रेल्वे गाड्यांना होणारा उशीर वारंवार सूचना देऊनही कमी होत नाही या संदर्भात सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. वंदे भारत ट्रेनला भंडारा येथे थांबा देण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली तसेच दोन्ही जिल्ह्यामध्ये बहुतांश “अंडरपास” मध्ये पाणी साचून असल्यामुळे प्रवाशांना जाणे-येणे अडचणीचे होते त्याकरिता इलेक्ट्रॉनिक ऑटेमेटीक मशीन लावण्यात यावे, कोरोना काळात जिल्ह्यातील विविध स्टेशनवर गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते ते थांबे पूर्ववत करण्याकरिता आदेश देण्यात आले.
बैठकीच्या शेवटी खासदार सुनील मेंढे यांनी संबोधित करताना रेल्वे संदर्भातील समस्यांचे अनुषंगाने वरिष्ठ स्तरापर्यंत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच अधिकाऱ्यांनीही प्रवाशांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी जबाबदारी चोखपणे बजावावी असे सांगितले.
यावेळी महाव्यवस्थापक आलोक कुमार, विभागीय रेल्वे नियंत्रक मनिंदर उत्पल, खासदार अशोक नेते, खा.कृपाल तुमाने, खा.सुरेश धानोरकर तसेच रेल्वेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.