Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedदेशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा : जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा : जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

गोंदिया : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी जवळ आली असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे. मतदानातूनच आपण आपले व देशाचे उज्ज्वल भविष्य निश्चित करू शकतो. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील मतदारांनो, कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे लोकशाही प्रक्रियेत सामील होऊन उत्स्फूर्तपणे मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम व जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्हावासीयांना केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन सुध्दा केले आहे. यावर्षी लोकशाहीचा उत्सव देशभरात साजरा होत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश मानला जातो. या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे आहे.

         भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. या मतदानाच्या माध्यमातूनच आपण आपले भविष्य घडवू शकतो. देशाच्या भविष्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन नि:ष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी कटिबध्द आहे. त्यामुळे 19 एप्रिल 2024 रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणूकीत सहभागी व्हा. विशेष म्हणजे कोणाच्याही दबावात न येता निर्भिडपणे मतदान करा. 63-अर्जुनी मोरगाव व 66-आमगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी 3 वाजतापर्यंत असून 64-तिरोडा व 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 18 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व नागरिकांनी सर्व कामे बाजुला ठेवून कर्तव्यनिष्ठ म्हणून सर्वांनी मतदानाचा हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

          लोकशाही प्रणालीत मतदार हा राजा असतो. लोकशाहीमध्ये निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो. हा उत्सव जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्याच्या उद्देशाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच लोकशाही बळकटीकरणासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क अवश्य बजवावा. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत गोंदिया जिल्ह्याचे मतदान प्रतिशत ६७ टक्के एवढे होते. या निवडणूकीत ही टक्केवारी ८५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी स्वीप अंतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदान करून गोंदिया जिल्ह्याच्या मतदानाची आकडेवारी वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे त्यांनी म्हटले आहे. मतदानासाठी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टीचा सदुपयोग करून ‘आधी मतदान नंतर बाकी काम’ अशी आपली दिनचर्या ठेवावी असे ते म्हणाले. मतदान केंद्रावर आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिव्यांग मतदार व वरिष्ठ मतदार यांच्यासाठीही केंद्रावर सुविधा असणार आहेत. फार उन्ह लागत आहे, उष्णतेमुळे मतदान केंद्रावर जाणे शक्य होणार नाही असे न म्हणता लोकशाही बळकटीकरणाकरीता मतदान करण्यासाठी केंद्रावर अवश्य जावे. उन्हाचे वाढते प्रमाण लक्षात घेता १९ एप्रिल शुक्रवार मतदानाच्या दिवशी हिट वेव्हच्या (उष्णतेची लाट) अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आरोग्य विभागामार्फत प्राथमिक उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल व कॅमेरा डिव्हाईस नेण्यास निवडणूक आयोगाने प्रतिबंध घातला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे मतदारांनी काटेकोरपणे पालन करावे. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीतील मुलभूत अधिकार आहे. हा आपल्या लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे. मतदान करणे हा केवळ अधिकारच नाही, तर ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील 18 वर्ष पूर्ण केलेल्या सर्व मतदारांनी उत्साहात मतदान करुन जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments