Thursday, April 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedनवेगावबांध तलावाचे ओलीत कागदावर

नवेगावबांध तलावाचे ओलीत कागदावर

6 हजारांपैकी सहाशे हेक्टरलाच ओलित : लपा विभागाची बेबंदशाही
गोंदिया : ’सरकारी काम, अन थोडा वेळ थांब’ अशी गोंदिया जिल्ह्यात म्हण आहे. ही म्हण जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाला तंतोतंत लागू पडते. माजी मालगुजारी तलावांपैकी एक आणि जिल्ह्यातील मोठ्या तलावांमध्ये ज्या तलावाचा समावेश होतो तो तलाव म्हणजे निसर्गरम्य आणि विदेशी पक्ष्यांकरिता प्रसिद्ध असलेला नवेगावबांध तलाव. या तलावातील पाण्याचे ओलित अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील 32 गावांतील सहा हजार हेक्टरला असल्याची शासन दरबारी नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात पाच गावांतील सातशे हेक्टरलाच ओलित करण्यात येत असल्याची खळबळजनक बाब उजेडात आली आहे. त्या पाच गावांमध्ये नवेगावबांध, खोली, देवलगाव, मुंगली आणि चान्ना या गावांचा समावेश आहे.
नवेगावबांध या विस्तीर्ण तलावाचे सहा हजार हेक्टर शेतजमीनीला सिंचन क्षमता आहे. तशी शासन दरबारी नोंद देखील आहे. 32 गावांतील शेतकऱ्यांनी लघु पाटबंधारे विभागाशी पाण्याचा करार केला. मात्र लघु पाटबंधारे विभागाची नियोजनशुन्यता आणि पाटचारे योग्य नसल्याने शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणीच पोहोचत नाही. नवेगावबांध तलावातील पाण्याचे ओलित शेतकऱ्यांच्या सातबारावर असून देखील येरंडी, बाराभाटी, ब्राम्हणटोला, कुंभीटोला, पिंपळगाव, चापटी, सुरगाव, सावरटोला, बोरटोला, उमरी, बिडटोला, बुरसी, सोमलपूर, गुढरी, बाक्टी, भागी, रिठी, गोंडउमरी, वळद, चिचटोला, वांगी, चिंगी, परसोडी, पांढरवानी(रै), पांढरवानी(माल.), खोबा आदी गावांना गेल्या कित्येक वर्षांपासून नवेगावच्या तलावाच्या ओलिताने शिवले देखील नाही. दरवर्षी खरीप हंगामात शेतकरी लघु पाटबंधारे विभागाकडे तलावाचे सिंचन देण्याची मागणी करतात. मात्र अधिकारी थातूरमातूर उत्तरे देवून शेतकऱ्यांना परत पाठवितात. त्याकरिता कर्मचाऱ्यांची कमतरता, वितरिकांची नादुरुस्ती अशी अनेक कारणे विभागाकडून पुढे करण्यात येत आहेत. उल्लेखनीय म्हणजे या सर्व गावांनी लघु पाटबंधारे विभागाशी करारनामा केला आहे. सिंचनाकरिता ग्राम पंचायतींनी विभागाकडे पत्रव्यवहार, ठराव पाठविले. मात्र ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. लोकप्रतिनिधी देखील हा विषय गांभिर्याने घेत नसल्याने शेतकऱ्यांचा वाली उरला नसल्याचा आरोप होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments