Thursday, September 19, 2024
Google search engine
HomeUncategorizedनागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन :...

नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन : स्मिता बेलपत्रे

गोंदिया  : जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे आणि त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्वीकारण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कक्षाला आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त झाले असून ते संबंधित विभागाला पाठविण्यात आले आहेत. या अर्जाचा नियमितपणे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  सर्व सामान्य माणसाला आपले प्रश्न व समस्या, अर्ज तसेच निवेदन देण्यासाठी मंत्रालयात जावे लागायचे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा खर्च व्हायचा. ही बाब लक्षात घेता सोबतच शासनात लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू करण्यात आला होता. ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे कक्ष सुरू झाला असून निवासी उपजिल्हाधिकारी हे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध  विशेष कार्य अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत असे त्यांनी सांगितले.

  जिल्हा स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी स्विकारण्यात येतील व याबाबतची पोचपावती संबधित अर्जदारास देण्यात येईल. ज्या अर्ज, संदर्भ व निवेदने यावर जिल्हा स्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे अशी प्रकरणे संबंधित जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात येईल. जिल्हयातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्नासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी तसेच सदर कक्षास प्राप्त होणारे अर्ज, संदर्भ व निवेदने या संदर्भात जिल्हाधिकारी जिल्हा स्तरावरील सर्व प्रमुख अधिका-यांसमावेत बैठक घेऊन संबंधित प्रकरणी तातडीने निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करण्यात येणार आहे. ही बैठक लोकशाही दिनी घेण्यात येणार आहे. ज्या प्रकरणी शासन स्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी सर्व वैयक्तिक, धोरणात्मक अर्ज, संदर्भ व निवेदने अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई यांना सादर करण्यात येतील अशी माहिती श्रीमती बेलपत्रे यांनी दिली. सर्वसामान्य जनतेला यापूर्वी मुख्यमंत्र्यांना अर्ज करण्यासाठी मंत्रालय, मुंबई येथे जावे लागत होते. आता राज्य शासनाने मुख्यमंत्री सचिवालयाचा कक्ष हा जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक २७ डिसेंबर २०२२ पासून सुरु केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांना मुख्यमंत्री यांच्याकडे त्यांच्या प्रलंबित कामाबाबत अडीअडचणी व तक्रारींबाबत अर्ज/निवेदने द्यावयाची असतील त्यांनी ती “जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष”, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे आवाहन श्रीमती बेलपत्रे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments