Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedपारदर्शक व मुक्त वातावरणात निवडणूक घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी प्रजित...

पारदर्शक व मुक्त वातावरणात निवडणूक घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी प्रजित नायर

आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी
सोशल मिडिया व फेक न्यूजवर करडी नजर
भूमिपूजन उद्घाटनावर प्रतिबंध
गोंदिया : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली त्या क्षणापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. देशभरात ४ जून २०२४ रोजी एकाच दिवशी मतमोजणी होईल. लोकशाहीचा उत्सव असलेली ही निवडणूक पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. बळाचा प्रयोग (मसल पावर), पैशांचा वापर (मनी पावर), चुकीची माहिती (मिस इन्फॉर्मेशन) आणि माध्यम समन्वय समितीच्या नियमांचे उल्लंघन ही निवडणूक यंत्रणेसमोरील महत्वाची आव्हाने असून यावर मात करण्यासाठी आयोगाच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यात येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
11 भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री. नायर बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेवून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची घोषणा केली असून आजपासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यासंबंधिची अधिसूचना जारी करण्यात आली असून आदर्श आचारसंहितेची माहिती सुध्दा निवडणूक आयोगाने दिली आहे. सदर अधिसूचनेद्वारे 20 मार्च रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिध्द करणे, 27 मार्चला नामनिर्देशन भरणे, 30 मार्च- अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत, 19 एप्रिल रोजी मतदान व 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.
सोशल मिडिया, पेड न्यूज व फेक न्यूजवर आयोगाची व जिल्हा प्रशासनाची करडी नजर असणार असून फेक न्यूज पसरविणाऱ्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल कडक कारवाई करेल. नागरिकांनी सोशल मिडियावर व्यक्त होतांना काळजी घ्यावी तसेच चुकीचे मेसेज पोस्ट करु नये किंवा फॉरवर्ड करु नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
सदर निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी हे भंडारा जिल्हाधिकारी असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षीत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
गोंदिया जिल्ह्यात 63-अर्जुनी मोरगाव, 64-तिरोडा, 65-गोंदिया व 66-आमगाव असे एकूण 4 विधानसभा मतदार संघ आहेत. आमगाव विधानसभा मतदारसंघ गडचिरोली मतदारसंघात समाविष्ट आहे. जिल्ह्यात एकूण 10 लाख 85 हजार 272 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 37 हजार 969 असून स्त्री मतदार 5 लाख 47 हजार 293 आहेत व इतर 10 मतदार आहेत. जिल्ह्यात उपलब्ध असलेले EVM-VVPAT (FLC OK) मशिन्सची संख्या- CU-1684, BU-3266, VVPAT-1841 आहेत. एकूण मतदान केंद्रांची संख्या 1284 आहे. या निवडणुकीत जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपक्रम राबवून मतदान जनजागृतीद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांना निवडणूक विषयी माहिती घेण्याकरीता व निवडणूक विषयी तक्रार बाबत गोंदिया जिल्ह्यामार्फत हेल्पलाईन क्रमांक 1950 (टोल फ्री), दूरध्वनी क्रमांक 07182-236148, मोबाईल क्रमांक 8080453152 कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या आदर्श आचारसंहिता दरम्यान निवडणुकीशी संबंधीत विविध कामे सुरळीत व विहित कालावधीत पार पाडण्याच्या कामाकरीता भारत निवडणूक आयोगाचे सूचनेप्रमाणे जिल्हास्तरावर 16 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे असे ते म्हणाले.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत अवैध रक्कम, दारु, प्रतिबंधीत औषधे, नशिले पदार्थांच्या वाहतुकी संदर्भात होणाऱ्या जप्तीबाबत Election Seisure Management System (ESMS) प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली असून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पोस्टल बॅलेट मतदान सुविधेसाठी 85 वर्षावरील नागरिक तसेच दिव्यांगासाठी त्यांच्याकडून फॉर्म नं-12 डी नमूना बीएलओ मार्फत भरुन घेण्यात येणार आहे. निवडणुक कालावधीत प्रसारमाध्यमांनी फेक न्यूज पोस्ट करुन विनाकारण अफवा पसरवू नये. पेड न्यूज बाबत आयोगाच्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, अन्यथा प्रशासनातर्फे योग्य ती कार्यवाही करण्यात येणार. मतदान हा एक उत्सव आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

निवडणूक कार्यक्रम :- अधिसूचना जारी करणे २० मार्च २०२४, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारिख २७ मार्च २०२४, अर्जाची छाननी २८ मार्च २०२४, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारिख ३० मार्च २०२४, मतदानाची तारिख १९ एप्रिल २०२४, मतमोजणीची तारिख ४ जून २०२४, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारिख ६ जून २०२४

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments