गोंदिया : तिरोडा तालुक्यातील अदानी विद्युत प्रकल्पात निघणारी फ्लॉय अॅशच्या वाहतुकीमुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर नागरिकांना वाहतुकीसह रहदारी करताना अडचणी निर्माण होत होती. तसेच वाहनातून उडणार्या फ्लॉय अॅशमुळे अनेक अपघात व आजारही, विशेषतः डोळ्यांचे होत होते. मात्र काही दिवसांपासून अदानी प्रकल्पातून वाहनांतून होणार्या फ्लॉय अॅशची वाहतूक बंद झाल्याने फ्लॉय अॅशच्या संकटातून जिल्ह्याला मुक्तता मिळाली आहे.
जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. या प्रकल्पात स्थायी पेक्षा अस्थायी रोजगार जास्त आहे. असे असले तरी शेकडो बेरोजगारांना काम मिळत आहे. त्यातच अदानी विद्युत प्रकल्पात वीज तयार करण्याकरिता मोठ्या प्रमाणात कोळशाच्या वापर होत आहे. त्यातून निघाणारी फ्लॉय अॅश चारचाकी वाहनांच्या माध्यमातून विविध स्थानी नेण्यात येते. ही फ्लॉय अॅश नेतांना गोंदिया-तिरोडा, तिरोडा-तुमसर तसेच इतर मार्गांवरही नागरिकांना प्रवास करणे कठीण होत असे. या प्रकाराने अनेकवेळा अपघात होत असतं. तसेच वाहनांतून उडणार्या राखेने नागरिकांना कमालीचा त्रासही सहन करावा लागत असे. मात्र काही दिवसांपासून चारचाकी वाहनांतून फ्लॉय अॅशची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या तरी जिल्ह्यात फ्लॉय अॅशच्या संकटातून व होणार्या पर्यावरणाच्या र्हासापासून मुक्त झाले आहे.
रेल्वेचे वेळापत्रक बिघडले
सध्या चारचाकी वाहनांतून होणारी फ्लॉय अॅशची वाहतूक बंद आहे. परिणामी ही फ्लॉय अॅश रेल्वेने नेण्यात येत आहे. परिणामी तिरोडा ते गोंदिया या मार्गावर प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक मागील काही दिवसांपासून बिघडले आहे. याला अदानी विद्युत प्रकल्पातील रेल्वेच्या माध्यमातून फ्लॉय अॅशची वाहतूक कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.