अर्जुनी मोरगाव येथे बुधवारी कडकडीत बंद पाळला
गोंदिया : अर्जुनी मोरगाव नगरपंचायतच्या वतीने मालमत्ता कर आकारणी नव्याने प्रस्तावित करण्यात आली आहे. रहिवाशांना प्रस्तावित कर आकारणीचे देयक देण्यात आले. ही वाढ अवाढव्य असल्याने बुधवारी व्यापारी संघटना व नगरवासीयांच्या वतीने नगरपंचायत कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या निमित्ताने शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शासकीय कार्यालय, शाळा, रुग्णालय, औषधाची दुकाने वगळता सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती.
बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भारतीय स्टेट बँकेसमोर व्यापारी व ग्रामस्थ गोळा झाले. येथून मोर्चाची सुरुवात झाली. गावातील बाजारपेठ मार्गाने हा मोर्चा दुर्गा चौकात पोहोचला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी व्यापारी व ग्रामस्थांनी मोर्चाला संबोधित केले. सभेच्या स्थळी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन घेण्यासाठी बोलाविण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे उपस्थित होत्या. व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीने मुख्याधिकारी राजू घोडके यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.यावर मोर्चेकऱ्यांचे समाधान झाले नाही. मोर्चेकऱ्यांची मालमत्ता करवाढ कमी करण्याची मागणी होती. मागणी कमी करण्याचे आश्वासन न देता मुख्याधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवले. यावरून मोर्चेकरी आणखी चिडले. त्यांनी परत हा मोर्चा नगरपंचायत कार्यालयाकडे वळविला. नगरपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला आधीच कुलूप लावलेले असल्याने व प्रवेशद्वारावर पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने मोर्चेकऱ्यांना नगरपंचायत कार्यालयात जाता आले नाही. सुमारे अर्धा तास मोर्चेकरी ठाण मांडून बसले. अखेर परत दुर्गा चौकात जाऊन सभा घेतली. मुख्याधिकाऱ्यांशी करवाढी संदर्भात सविस्तर चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासंदर्भात एकमत करण्यात आले. मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ नगरपंचायत कार्यालयात पोहोचले. मात्र मुख्याधिकारी हे तत्पूर्वीच तिथून निघून गेले होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांप्रती नाराजीचा सूर दिसून आला.
मालमत्ता करवाढी विरोधात जन आक्रोश मोर्चा
RELATED ARTICLES