युवा उत्सव कार्यक्रमात युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
गोंदिया : केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत नेहरु युवा केंद्राच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय युवा उत्सवातील विविध स्पर्धांच्या माध्यमातून महाविद्यालयातील शिक्षणाबरोबरच युवकांच्या कलागुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शुभांगी मेंढे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचे प्राचार्य सी.जी.गोळघाटे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य हेमंत आवारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक अविनाश लाड, नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी श्रृती डोंगरे, जनशिक्षण संस्थेचे संस्थापक विनायक डोंगरवार व आरसेटीचे सतीश झाडे उपस्थित होते. नेहरु युवा केंद्राद्वारे आयोजित जिल्हास्तरीय युवा उत्सवामध्ये कविता लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, समुह लोकनृत्य, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेत युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव दयावा व आपले भविष्य उज्ज्वल करावे. नवनविन कला अवगत करण्याची आपल्यामध्ये उत्सुकता असायला पाहिजे. केंद्र सरकारच्या माध्यमातून नेहरु युवा केंद्राद्वारे विविध योजना राबविण्यात येतात, त्या योजनांचा लाभ घेऊन युवकांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करावा. अशा युवा उत्सवाच्या माध्यमातून युवकांनी आपल्यामध्ये असलेले कौशल्य गुण सादर करुन आपले भविष्य घडवावे असे ते म्हणाले. पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करावा असेही त्यांनी सांगितले. भारत यावर्षी G20 शिखर परिषदेचे प्रतिनिधीत्व करीत आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. G20 व Y20 विषयी माहिती सांगतांना वसुधैव कुटूंबकम या ब्रिदवाक्याचे सविस्तरपणे विवेचन करुन युवकांनी पाश्चिमात्य संस्कृतीला नाकारुन भारतीय संस्कृतीचा स्विकार करावा. वडिलधाऱ्या व्यक्तींचा आदर करावा असे शुभांगी मेंढे म्हणाल्या. युवक-युवतींच्या जीवन कौशल्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या भाषणातून युवकांना जनचेतना मिळाली हे विशेष. धकाधकीच्या जीवनात आज युवकांमध्ये ताणतणाव दिसत आहे, यातून अनेक युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत. तेव्हा अशा उत्सवाच्या माध्यमातून स्पर्धेत सहभाग घेतल्याने तणावमुक्त जीवन जगता येते. आजच्या युवा पिढीने त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांनी भारताची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करावी. युवकांनी स्पर्धा परीक्षेची सक्षमपणे तयारी करुन आपले भविष्य उज्जवल करावे. आयआयटी इंजिनियर झालेल्या युवकांनी नवनविन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करावी. युवकांनी आपला स्वत:चा उद्योग उभारुन आपल्या पायावर उभे राहावे. पुस्तकासारखा चांगला मित्र कोणी नाही. आजचा युवक हा सुदृढ असायला पाहिजे असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, भारतीय जेवन हे पारंपारिक जेवन आहे, म्हणून आपल्या रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा समावेश करावा. जीवनात मुलांनी आपल्या आई-बाबांना विसरु नये, आपले घर विसरु नये, आपल्या गावाला विसरु नका, तुमच्या संस्काराला विसरु नका. आजचा युवक हा संस्कारक्षम घडला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जन शिक्षण संस्था गोंदिया रुची महिला बचत गट, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, कला ड्रॉईंग पेन्टींग स्केच, कृषी विभाग, नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषि विभाग (केंद्र शासन) इत्यादी स्टॉल लावण्यात आले होते. युवा उत्सवामध्ये कविता लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, समुह लोकनृत्य, मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेत कुलदिपीका बोरकर, कविता राजाभोज, संगीता घोष, मिलींद रंगारी व रवि चंद्रिकापुरे यांनी परीक्षकाचे काम पार पाडले. कार्यक्रमास जिल्ह्यातील युवक-युवती बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. बबन मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी श्रृती डोंगरे यांनी मानले.
युवा उत्सवाच्या माध्यमातून युवकांच्या सुप्त कलागुणांना वाव : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
RELATED ARTICLES