गोंदिया : सालेकसा तालुक्यातील तिरखेडी- सातगाव मार्गाची अतिशय दुर्दशा झाली आहे. या मार्गावरून ये-जा करणे फारच कठीण झाले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार विनंती केल्यानंतरही लक्ष देत नसल्याने त्रस्त झालेल्या तिरखेडी- कारुटोला क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सोमवारी (दि.३) रास्ता रोको आंदोलन आणि भजन, दिंडी काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सालेकसा तालुक्यातील तिरखेडी- सातगाव मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी म्हणून आ. सहषराम कोरोटे, जि.प.सदस्या वंदना काळे, जि.प.सदस्या विमल कटरे यांच्यासह रेखा फुंडे व इतर लोकप्रतिनिधींनी जिल्हा बांधकाम विभागाकडे तसेच जिल्हाधिकारी गोतमारे यांच्याकडे पत्रव्यवहार करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला याबाबत आदेश दिले; परंतु बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष न देता टाळाटाळ करण्याचे उत्तर दिले. त्यामुळे रस्ता दुरुस्ती केव्हा होईल हे काही निश्चितपणे सांगता येत नाही. ही बाब लक्षात घेता तिरखेडी येथील पावर हाऊस चौकात सोमवारी रास्ता रोको आंदोलन करून भजन, दिंडी काढण्यात आली. यात काँग्रेसचे आ. सहषराम कोरोटे हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी सुध्दा नागरिकांच्या मागणीकडे शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त केला. सालेकसा तालुक्यातील सातगाव या गावातून सातगाव – सालेकसा रस्त्याची दुरावस्था झाली परिणामी या मार्गाची दुरावस्था झाली आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यात जि.प.सदस्या छाया नागपुरे, उषा मेंढे, सरपंच प्रिती शरणागत, सरपंच वैभव कावरे, डॉ. संजय देशमुख, संतोष बोहरे, रामेश्वर कटरे, सरपंच गोऱ्हे, बबलू कटरे, गजानन कटरे आदी सहभागी झाले होते.
रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी काँग्रेसचे भजन दिंडी आंदोलन
RELATED ARTICLES