Tuesday, June 25, 2024
Google search engine
HomeUncategorizedलोकशाही बळकटीकरणासाठी मतदान अवश्य करा : जिल्हाधिकारी प्रजित नायर

लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान अवश्य करा : जिल्हाधिकारी प्रजित नायर

सायकल व बाईक रॅलीद्वारे मतदान जनजागृती
गोंदिया : देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. निवडणूक प्रणालीत मतदार हा राजा आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवून लोकशाही बळकटीकरणासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले. गोंदिया येथील जयस्तंभ चौकात आज सायकल व बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. महेंद्र गजभिये व शिखा पिपलेवार, तहसिलदार समशेर पठाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, भारत निर्वाचन आयोगाकडून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. त्यानुसार राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूका होणार असून पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 जूनला भंडारा येथे मतमोजणी होणार आहे. सन 2019 मध्ये झालेल्या निवडणूकीत गोंदिया जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी 67 टक्के होती. या निवडणूकीत जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी 85 टक्केच्या वर नेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक नागरिकांनी मतदान करण्यासाठी आज गोंदिया शहरात सायकल व बाईक रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे असे सांगून ते पुढे म्हणाले, मतदानाचा अधिकार हा कोणत्याही लोकशाही समाजातील मुलभूत अधिकार आहे. हा आपल्या लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे. मतदान करणे हा केवळ अधिकारच नाही, तर ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे. त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील 18 वर्ष पूर्ण केलेल्या सर्व मतदारांनी उत्साहात मतदान करुन जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात SVEEP (Systematic Voters Education and Electoral Participation) अर्थात स्वीपच्या माध्यमातून जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविणे, 18 वर्षावरील नवमतदारांची नोंदणी करणे, दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना मतदानाच्या या प्रक्रियेत सहभागी करून घेणे इत्यादी कामे स्वीपच्या मार्फत हाती घेण्यात आली आहेत.

         सदर सायकल रॅली गोंदिया येथील मनोहर चौक येथून निघून जयस्तंभ चौक-गांधी चौक-चांदणी चौक-भवानी चौक-दुर्गा चौक, गोरेलाल चौक-नेहरु चौक अशी मार्गक्रमण करुन जयस्तंभ चौक येथे संपन्न झाली. तसेच बाईक रॅली जयस्तंभ चौक येथून निघून उड्डाण पूल-विश्राम गृह-पाल चौक-एनएमडी कॉलेज-गायत्री मंदिर-अवंती चौक-बालाघाट रोड-टी पाईंट-बस स्थानक-उड्डाण पूल अशी मार्गक्रमण करुन जयस्तंभ चौक येथे संपन्न झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments