गोंदिया : राज्य शासनाने जून 2023 मध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही प्रती अर्ज 1 रुपया भरुन पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकतेप्रमाणे योजनेत सहभागी होता येईल. जिल्ह्यात हरभरा आणि उन्हाळी भात पिकासाठी पीक विमा काढता येईल. पिकांसाठी 70 टक्के जोखीमस्तर निश्चित केला आहे. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे. शासनाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर स्वत: तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून हरभरा पिकासाठी अंतिम मुदत 15 डिसेंबर 2024 असून उन्हाळी भात पिकासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2025 असणार आहे.
रब्बी हंगामात हरभरा पिकासाठी अधिसूचित महसूल मंडळ : तिरोडा तालुका- तिरोडा, ठाणेगाव, परसवाडा, वडेगाव, मुंडीकोटा. अर्जुनी मोरगाव तालुका- अर्जुनी मोरगाव, बोंडगाव-देवी, केशोरी/कन्हेरी, महागाव, नवेगावबांध, गोठणगाव. सडक अर्जुनी तालुका- सडक अर्जुनी, सौंदड, डव्वा, शेंडा, कोसमतोंडी. देवरी तालुका- देवरी, मुल्ला, सिंदीबिरी, चिचगड, ककोडी. उन्हाळी भात पिकासाठी सर्व तालुक्यामध्ये पीक विमा लागु राहील. तरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर 2024 पूर्वी हरभरा व 31 मार्च 2025 पूर्वी उन्हाळी भात पिकासाठी पीक विमा भरुन योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानावडे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनो! एक रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागी व्हा : निलेश कानावडे
RELATED ARTICLES