गोंदिया. जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजण्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाकरीता आज, 24 जानेवारी रोजी निवडणूक झाली. त्यासाठी कमी सदस्यसंख्या असतानाही महाआघाडीकडून कॉंग्रेसने दोन्ही पदांकरीता अर्ज दाखल केले. परंतु, आपली नाचक्की होवू नये, यासाठी अर्ज मागे घेतले. परिणामी अध्यक्षपदी भाजपचे बोंडगावदेवी जिल्हा परिषद क्षेत्राचे लायकराम भेंडारकर आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घाटटेमनी क्षेत्राचे सदस्य सुरेश हर्षे यांची बिनविरोध निवड झाली. आता सभापतीपदाच्या निवडणुकीतही हाच फॉर्म्यूला राहणार आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक 2022 मध्ये झाली. 53 सदस्यसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे 27, कॉंग्रेसचे 11, राष्ट्रवादीचे 8, आमदार विनोद अग्रवाल यांच्या चावी गटाचे 5 आणि अपक्ष 2 सदस्य निवडून आले. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि दोन्ही अपक्षांनी भाजपला साथ दिली. त्यावेळी अध्यक्षपदी पंकज रहांगडाले यांची वर्णी लागली. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे यशवंत गणवीर यांची निवड झाली. त्याचबरोबर राष्ट्रवादीला एक सभापतीपद, तर भाजपला दोन, राष्ट्रवादीला एक आणि अपक्ष एक सभापतिपद मिळाले होते. मधातच विधानसभा निवडणूक आल्यामुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची खांदेपालट दोन वर्षांवरून अडीच वर्षांवर गेली. अखेर आज, 24 जानेवारी रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाकरीता निवडणूक घेण्यात आली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे दोन्ही पदे जुन्याच फॉर्म्युल्यानुसार राहतील, हे आधीच ठरले होते. त्यानुसार आज, दुपारी 12 वाजता अध्यक्षपदाकरीता भाजपकडून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी जि.प. क्षेत्राचे सदस्य आणि आमदार राजकुमार बडोले यांचे निकटवर्तीय समजण्यात येणारे लायकराम भेंडारकर यांनी अर्ज दाखल केला. तर उपाध्यक्षपदाकरीता जुन्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून घाटटेमनी जि. प. क्षेत्राचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश हर्षे यांनी अर्ज दाखल केला. तर कॉंग्रेसकडून अध्यक्षपदाकरीता सशेंद्र भगत आणि वंदना काळे यांनी उपाध्यक्षपदाकरीता नामांकन दाखल केले होते. मात्र कॉंग्रेसच्या दोन्ही सदस्यांनी नामांकन परत घेतले. परिणामी भाजपचे लायकराम भेंडारकर आणि उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांची बिनविरोध निवड झाली. आज पार पडलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपकडून नावांबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी आमगाव आणि अर्जुनी मोरगाव या दोन तालुक्यांनी दावेदारी केली होती. मात्र अर्जुनी मोरगावला संधी मिळाली. त्यात आमदार राजकुमार बडोले यांनी आपल्या समर्थकाला अध्यक्षपद मिळविण्यात यश मिळविल्याची चर्चा आहे.






