Saturday, September 7, 2024
Google search engine
HomeUncategorizedदोन वेळा आमदार राहिलेल्या नेत्याची घरवापसी, प्रवेश देताना उद्धव ठाकरेंनी विचारला मिश्किल...

दोन वेळा आमदार राहिलेल्या नेत्याची घरवापसी, प्रवेश देताना उद्धव ठाकरेंनी विचारला मिश्किल प्रश्न!

गोंदिया : गोंदियातील माजी आमदार रमेश कुथे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. महिनाभरापूर्वी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रमेश कुथे हे नेमके कोणत्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता होती. अखेर कुथे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला आणि आज मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधलं आहे.
रमेश कुथे हे शिवसेनेच्याच तिकिटावर गोंदिया मतदारसंघातून १९९५ आणि १९९९ असे दोन टर्म आमदार राहिले आहेत. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये गेल्यापासून कुथे हे काहीसे अडगळीत पडल्याचं पाहायला मिळालं. मागील महिन्यात त्यांनी भाजप नेतृत्वावर गंभीर आरोप करत पक्षातील सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर ते काँग्रेसच्याही संपर्कात होते. मात्र त्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

प्रवेश देताना उद्धव ठाकरे काय म्हणाले?
शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले आणि आता पुन्हा घरवापसी करत असलेले माजी आमदार रमेश कुथे यांना शिवबंधन बांधत असताना उद्धव ठाकरेंनी एक प्रश्न विचारत मिश्किल टोला लगावला. “मी आता तुम्हाला शिवबंधन बांधत आहे, पण तुम्ही पुन्हा पक्ष सोडला तर?” असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर रमेश कुथे यांनीही हजरजबाबीपणे उत्तर देत म्हटलं की, “मी पक्षासोबतच होतो, फक्त शिकण्यासाठी तिकडे गेलो होतो.”

भाजपमधून बाहेर पडताना फडणवीसांवर आरोप
“२०१९ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकीचे तिकीट देण्याचा शब्द देऊनही तो पाळला नाही. बावनकुळेंच्या १०० आले तर ५ जातील आणि ९५ राहतील या वक्तव्यानंतर भाजपात आपली गरज राहिली नाही,” असा आरोप करत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी मागील महिन्यात भाजपाला रामराम केला होता. “२०१९ मध्ये पक्षप्रवेश करताना आमदारकी देण्याच्या आश्वासनावर त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिले होते. पण पूर्ण केले नाही. पक्षात नवीन लोक येतात त्यांना सन्मान मिळत नाही, असा आरोप कुथे यांनी भाजपमधून बाहेर पडताना केला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments