प्रतापगड यात्रेदरम्यान वाहतूक मार्गात बदल, जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी

0
228

26 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत प्रतापगड यात्रेचे आयोजन
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे 26 फेब्रुवारी ते 2 मार्च 2025 या कालावधीत ‘महाशिवरात्री’ निमित्ताने  यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या दरम्यान ख्वाजा गणी हारुनी उर्सचे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे. प्रतापगड यात्रेत विविध जिल्ह्यातून व शेजारच्या राज्यातून अंदाजे 4 ते 5 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. सदर भाग नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने त्या ठिकाणी भाविकांची व त्यांच्या वाहनांची प्रचंड गर्दी होते. सदर ठिकाणी वाहतुकीकरीता असलेला रस्ता हा अरुंद असल्याने त्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते.
भाविकांची गैरसोय झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एकेरी वाहतुकीचा अवलंब करणे आवश्यक असल्याने, मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 व गृह विभागाच्या 19 मे 1990 च्या शासकीय अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जिल्ह्यातील प्रतापगड येथील ‘महाशिवरात्री’ निमित्ताने होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने 26 फेब्रुवारी ते 2 मार्च 2025 पर्यंत खालील मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहे. प्रतापगड यात्रेकरीता येणारी सर्व वाहने सुकळी फाटा मार्गे प्रतापगड देवस्थानकडे येतील. प्रतापगड यात्रेतून बाहेर जाणारी सर्व वाहने ही गोठणगाव मार्गे नवेगावबांध कडे बाहेर पडतील. सदर आदेशाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग, गोंदिया यांनी पोलीस स्टेशन केशोरीचे प्रभारी अधिकारी यांच्या मदतीने आवश्यक त्या ठिकाणी सूचनात्मक वाहतूक चिन्हे व बोर्ड लावून घ्यावेत. सदर आदेश 26 फेब्रुवारी पासून ते 2 मार्च 2025 पर्यंत अंमलात राहील. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here