काळी फित लावून संपाला पाठींबा : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन
गोंदिया : भारतीय राज्यघटना समान कामाला समान वेतन देण्याचे वचन भारतीय नागरीकांना देते. मात्र, शासन राज्यघटनेतील तरतूदींची पायमल्ली करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करून, समान कामाला समान वेतन देण्याच्या मागणीसह कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने 14 मार्च पासून सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बेमूदत संपाला पाठींबा देण्यात आलेला आहे. तसे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती शितल पुंड यांना देण्यात आले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपले उमेदीचे वय शासनाच्या सेवेत घालविले. अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेतील वयोमर्यादा ओलांडली आहे. मात्र, त्यांना अद्याप सेवेत कायम करण्यात आलेले नाही. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची तरतूदही नाही. अथवा त्यांना विमा संरक्षण नाही. आरोग्याच्या सुविधा सुध्दा त्यांना नाकारण्यात आलेल्या आहेत. मुख्य म्हणजे, शासनाकडून कंत्राटी कर्मचायांना नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते. भविष्याची सुरक्षितता नसल्याने अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराने देहावसान झाले. कोव्हीड सारख्या महामारीच्या काळात शासकीय यंत्रणेसह कंत्राटी कर्मचारी अवितर कार्यरत होते. मात्र, शासनाने याची सुध्दा दखल घेतली नाही. समान कामाला समान वेतन नाकारणे हा शासनाचा कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. सर्व संवर्गातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, ही अगदी रास्त मागणी आहे. दरम्यान निवेदनातून NPS रद्द करा. जुनी पेन्शन योजना (OPS) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा. PFRDA कायदा रद्द करा. कंत्राटी, अंशकालिन, रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा. सर्व रिक्त पदे तात्काळ भरा. अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाशर्त करा. चतुर्थ श्रेणी व वाहन चालक पदे भरण्यावरील बंदी हटवा. शिक्षक-शिक्षकेत्तर- पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सत्वर मंजूर करा. कामगार कायद्यातील बदल केलेल्या जाचक अटी रद्द करा. आठवा वेतन आयोग स्थापनेची घोषणा करा, या सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्यात अशी मागणी कंत्राटी कर्मचारी महासंघाने केली आहे. निवेदन देतांना पाणी व स्वच्छता विभागाचे अतुल गजभिये, राजेश उखळकर, तृप्ती साकुरे, सूर्यकांत रहमतकर, दिशा मेश्राम, विशाल मेश्राम, जितेंद्र येरपुडे, भागचंद रहांगडाले, रमेश उदयपूरे, सर्व शिक्षा अभियानाचे दिलीप बघेले, प्रदीप वालदे, राजेश मते, बुध्दभूषण सोनकांबळे, राजकुमार गौतम, विलास लिल्हारे, मनोज शेणमारे, महेंद्र साखरे, उमेद अभियानाचे सुनिल तावाडे, नरेंद्र रहांगडाले, राधेश्याम बारापात्रे, सूर्यकांत त्रिपाठी, विनोद शेंडे, आरोग्य विभागाचे अर्चना वानखेडे, अल्का मिश्रा, भुवनेश्वरी देशमुख, उकदास बिसेन, डॉ. नम्रता दोहाते, राजेश दोनोडे, राकेश राखडे, ज्योति सावरकर, संकेत मोटघरे आणि कंत्राटी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
काळी फित लावून आंदोलन
जिल्हयात पाच हजार पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा दर्शवितांना विविध संवर्गातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून आंदोलनाला पाठींबा दर्शविण्याचे आवाहन कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.