गोंदिया : जिल्ह्यातून गेल इंडिया लि.कंपनीची गॅस पाईप लाईन जात आहे. यासाठी युध्दपातळीवर काम सुरू आहे. मात्र ज्या शेतकर्यांच्या शेतातून ही पाईपलाईन जात आहे. त्यातच काही शेतकर्यांना त्याचा मोबदला देण्यात आला असला तरी ज्या ठिकाणाहून पाईप लाईन गेली आहे. ती जमिन निरुपयोगी झाली आहे, तर दुसरीकडे मांडवी, बेलाटी, कवलेवाडा आदी परिसरातील गॅस पाईप लाईनचे काम पुर्ण झाले आहे मात्र शेतकर्यांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही. परिणामी निरुपयोगी जमिन व मोबादला न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सविस्तर असे की, तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा येथील शेतकर्यांच्या शेतातून गेल इंडिया कंपनीची मुंबई – नागपूर ते झारसुकडा गॅस पाइपलाइनचे काम सुरू आहे. याकरिता अधिग्रहित करण्यात येत असलेल्या जमिनीचा मोबदला तज्ज्ञाकडून जमिनीच्या बाजारभावाचे किमतीच्या फक्त १० टक्के रक्कम दिली जाणार आहे. जी बाधीत क्षेत्राच्या तुलनेत खुप कमी आहे. गेल कंपनीने वीस मीटर रूंद पट्टीची जमीन बाधित क्षेत्र म्हणून वापर करण्याचा हक्क बळजबरीने संपादित केली आहे. २० मीटर रूंदीच्या पट्टीत शेतकर्याला कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. गुरांचा गोठा, तळे, विहीरी, पाण्याचा साठा, धरण किंवा कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. आपल्याच शेतात कोणत्याही प्रकारचे झाडे लावता येणार नाही. व तसे करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकर्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मुभाही त्या कायद्यात आहे. त्यामुळे ती जमिन निरुपयोगी ठरणार आहे. या पाईपलाईनच्या कामाला घेवून परिसरातील शेतकर्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यातच कवलेवाडा येथील शेतकरी आपली शेती गेल कंपनीला द्यायला तयार नव्हते, याविषयी शेतकर्यांशी तडजोड करायला उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ( म.राज्य ) गेल इंडिया व त्यांची संपूर्ण टीम गावात आली होती. शेतकर्यांनी आपल्या शेतात भविष्यात करणार असलेल्या योजना सांगितल्या व होणार्या नुकसानीची योग्य ती भरपाई देण्याची व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नौकरी मिळवून देण्याची मागणी केली. पण त्या मागणीकडेही यंत्रणेसह जिल्हा प्रशासनानेही दुर्लक्ष केले. परिणामी आजही शेतकर्यांना जमिनीची मोबदला मिळालेला नाही. या बाबीला आज ८ महिलाचा अवधी लोटला. मांडवी, बेलाटी, कवलेवाडा आदी गावातील पाईप लाईनचे कामही पुर्ण झाले मात्र मोबदला न मिळाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहे. तेव्हा लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे लक्ष देवून शेतकर्यांना न्याय देण्याची मागणी गामस्यांनी केली आहे.
………
गेल इंडिया कंपनीच्या वतीने गॅस पाईप लाईनचे काम करण्यात आले. कंपनीच्या जाचक अटी शेतकर्यांना मारक ठरले आहे. परिणामी गावागावात या पाईपलाईनला शेतकर्यांनी विरोध केला. आपल्याच शेतीत शेतकर्यांना आखलेल्या योजना व इतर उद्योग व्यवसाय करता येणार नाही. त्यामुळे शेतकर्यांना कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.शेतजमीन विक्री करायची वेळ येईल व विक्री करायचीही असल्यास मातीमोल भावाने द्यावी लागेल आणि शेतकरी रस्त्यावर येईल.
– संतोष ठाकरे, शेतकरी कवलेवाडा






