रस्ता न मिळाल्याने जवानाचं बेमुदत उपोषण; प्रकृती चिंताजनक अवस्थेत, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उपोषणाला गंभीर वळण

0
417

जवानाच्या प्रकृतीत बिघाड; उपोषण पेंडालमध्येच वैद्यकीय उपचार सुरू, 2011 पासून तक्रारी करूनही रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही

गोंदिया : गोरेगाव  तालुक्यातील कुरहाडी गावचे रहिवासी आणि सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये कार्यरत असलेले जवान निरंजन श्रावण येरणे यांनी आपल्या पुश्तैनी घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी दिनांक १४ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. उपोषणस्थळी डॉक्टरांची टीम तात्काळ दाखल झाली असून उपचार सुरू करण्यात आले आहेत. निरंजन यांचे म्हणणे आहे की, २०११ पासून ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे वेळोवेळी अर्ज आणि तक्रारी करूनही त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाणारा सुमारे १५० फूट लांब व १० फूट रुंद रस्ता अतिक्रमणमुळे बंद असल्याने वापरता येत नाही.

या प्रकरणात न्यायालयाचे आदेश, पोलीस केस दाखल, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश असूनही ग्रामपंचायत कुन्हाडी आणि प्रशासनाने कारवाईस टाळाटाळ केली. २०२३ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतरही ते घरापर्यंत पोहोचू शकले नाहीत, हे विशेष दुर्दैवाचे आहे. निरंतर यांनी २८ जून रोजी लेखी इशारा दिला होता की, रस्त्याचा प्रश्न न सुटल्यास आत्मदहनासारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, त्यास संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची असेल. मात्र, त्यावेळी पंचांसमोर समझोता झाल्यामुळे त्यांनी आत्मदहन रोखले. पण प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे त्यांनी आता बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला.

निरंजन येरणे म्हणाले, “मुख्यमंत्री येईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, जीव गेला तरी चालेल पण आता मागे हटणार नाही.” त्यांच्या तब्येतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे. परंतु प्रकृती खालावल्याने हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. प्रश्न असा आहे की, १५ वर्षांपासून चाललेल्या अन्यायाला आता पूर्णविराम मिळणार का? प्रशासन जागं होईल का? की जवानाचं बेमुदत उपोषण आणखी गंभीर वळण घेणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here