Tuesday, April 23, 2024
Google search engine
HomeUncategorizedछत्तीसगढ संघ ठरले भजेपार चषकाचे मानकरी

छत्तीसगढ संघ ठरले भजेपार चषकाचे मानकरी

आंतरराज्यीय महीला, पुरुष कबड्डीचा थरार बघायला उसळला जनसागर

गोंदिया : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात नावाजलेल्या ‘भजेपार चषक’ महिला, पुरुष कबड्डीचा महासंग्राम यंदा चांगलाच गाजला. फायनल मधील अटीतटीच्या चुरशीच्या लढतीत महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात छत्तीसगढ संघाने विजयाचा झेंडा रोवला. दरम्यान हा रोमहर्षक कबड्डीचा महासंग्राम बघायला हजारो प्रेक्षकांचा जनसागर उसळला असला तरी शांतता व सुव्यवस्था अबाधित राहिल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे मागील एक दशकापासून आंतरराज्यीय महिला पुरुष कबड्डी स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असल्याने दूर दुरून प्रेक्षक येतात. कोविडमुळे मागील दोन वर्ष ही स्पर्धा झालेली नव्हती त्यामुळे या स्पर्धेची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. दीर्घ काळानंतर यंदा पुन्हा नव्या जोमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, सहित ईतर प्रांतातील विविध संघ सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय त्याच प्रमाणे प्रो कबड्डीचे स्टार खेळाडू सहभागी झाल्याने प्रेक्षकांमध्येही उत्साह दिसून आला. अनेक संघात दिग्गज खेळाडू असल्याने अटीतटीची लढत बघायला मिळाली. पुरुष गटातून छत्तीसगढ बिलासपूर प्रथम, उत्तर प्रदेशातील युपी योद्धा संघ द्वितीय तर मध्य प्रदेश भोपाल संघाने तृतीय स्थान पटकावला. महिला गटातून छत्तीसगढ साई राजनांदगाव संघ प्रथम, महाराष्ट्र मुंबई संघ द्वितीय तर मध्य प्रदेश आरसीसी जबलपूर संघाने तिसरे स्थान पटकावले. आकर्षक चषक आणि रोख बक्षीस देऊन विजयी संघांचा गुणगौरव करण्यात आला. ईतर हजारोंची वैयक्तिक बक्षिसांची मेजवानी देखील देण्यात आली तीन दिवसीय ही स्पर्धा रात्र आणि दिवस अशा दोन्ही सत्रात घेण्यात आली असून यासाठी भव्य दिव्य मंडप डेकोरेशन, जनजागृती, प्रेक्षकांना बसण्यासाठी आकर्षक गॅलरी, सुविधेसाठी मोबाईल टॉयलेट, खेळाडूंसाठी प्रवास, निवास आणि भोजन व्यवस्था आदी सर्वच प्रकारच्या सुविधा आयोजकांनी उपलब्ध केली होती. लहानशा खेड्यात एवढ्या भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन होत असल्याने खेळाडूंसह प्रेक्षक आणि कबड्डी प्रेमींनी आयोजक मंडळ आणि गावकऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला हे विशेष!
सूर्योदय क्रीडा मंडळ आणि ग्राम पंचायत भजेपार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, शाळा व्यवस्थापन समिती, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष, भजेपार शिक्षण कल्याण संघ, चौरागड आश्रम समिती, सर्व महिला पुरुष बचत गट आणि संपूर्ण ग्रामवासी यांनी अथक परिश्रम घेतले असून स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचे आयोजकांनी जाहीर आभार व्यक्त केले आहे.

2 इंटरनॅशनल, 38 नॅशनल आणि 3 प्रो कबड्डी स्टार खेळाडूंनी वाढविला गौरव!

भजेपार चषक 2023 मध्ये कबड्डीच्या दुनियेतील दिग्गजांनी सहभागी होऊन कबड्डी प्रेमींच्या आनंदात भर घातली. यात 2 इंटरनॅशनल, 38 नॅशनल आणि 3 प्रो कबड्डी स्टार खेळाडूंचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय व प्रो कबड्डी स्टार प्लेयर मुम्बई संघाचे कोच पंडित पवार, ज्यू. आंतरराष्ट्रीय खेळाडू मनोज बाली (भोपाल), प्रो कबड्डी स्टार दुर्गेश नेताम ( बिलासपूर) यांच्यासह मध्यप्रदेशातील 25 नॅशनल खेळाडू, छत्तीसगड येथून 13 नॅशनल खेळाडू, महाराष्ट्रातून 17 नॅशनल खेळाडू, हरियाणातील 3 आणि उत्तर प्रदेशातील 5 नॅशनल खेळाडू सहभागी झाले. प्रेक्षकांना माहीत होताच त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments