तीन दिवसाच्या संततधार पावसामुळे शेकडो घरांचे नुकसान

0
166

गोंदिया : जिल्ह्यात ७, ८ व ९ जुलै रोजी पावसाने थैमान घातले. शेकडो, घरे, गोठ्यांचे नुकसान झाले. अतिवृष्टिने झाडे उल्मडून पडल्याने तिघांचा जीव गेला. नदी, नाले काठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली आली. असे असताना कृषी विभाग म्हणतो २ हेक्टरातीलच पिकाचे नुकसान अन् तेही सडक अर्जुनी तालुक्यात. दुसरीकडे लागवड केलेले धान व नर्सरीचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगताहेत. मात्र अद्यापही कृषी विभागाने प्रत्येक्ष पाहणी केली नसल्याची माहिती आहे.
यंदा हवामान विभागाचा अंदाज चुकला. अंदाजानुसार आडवडाभरापूर्वी येणार्‍या मान्सूनचे आगमन लांबले. परिणामी पेरण्या लांबल्या. जिल्ह्यात २७ जूनपासून मोसमी पावसाने हजेरी लावली. ५ जुलैपासून जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस सुरू झाला. ६ जुलै रोजी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. ७ रोजी गोंदिया व तिरोडा तालुक्यात अनुक्रमे ६४.४, ७२.९ मिमी पाऊस झाला. यानंतर जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहिला. ८ जुलै रोजी यंदाच्या हंगामातील विक्रमी ११६.४ मिमी पाऊस बरसला. या दिवसी सर्वाधिक २२६.५ मिमी पाऊस देवरी तालुक्यात तर अर्जुनी मोर २०६.९, तिरोडा १२०, गोंदिया १०४.५, सालेकसा ७५.७ आणि सडक अर्जुनी तालुक्यात ७४ मिमी पाऊसाची नोंद झाली. ४१ मंडळांपैकी ३१ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. ९ जुलै रोजी देवरी १०४.५ मिमी, सडक अर्जुनी १२०.६, अर्जुनी मोर ८९.६ मिमी असा जिल्ह्यात सरासरी १६६.६ मिमी पाऊस कोसळला. तीन दिवसाच्या पावसाने २६८ घरांचे अंशतः, ७ घरे पूर्णतः धराशाही झाले. ८४ गोठ्यांना फटका बसला. अतिवृष्टिने झाडे पडून तीनजण मृत्यूमुखी तर तिघे जखमी झाले. नदी, नाले काठावरील शेकडो एकर शेती पाण्याखाली आली. चार दिवस पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्याने लागवड केलेले धान व कोवळ्या धान नसर्‍याचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगताहेत. असे असताना कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी शेतीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे सौजन्य दाखविले नसल्याने शेतकर्‍यांमध्ये यंत्रणेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सलग तीन दिवस अतिवृष्टी होऊनही कृषी विभाग म्हणतो नुकसान नाही. हे आश्चर्यच म्हणावे लागेल.
0
प्राथमिक माहितीनुसार, सध्या तरी मोठे नुकसान झालेले नाही. पंचनामे झाल्यावरच नुकसानीचा अंदाज येईल. सडक अर्जुनी तालुक्यात २ हेक्टर क्षेत्रातील पपई व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे.
– निलेश कानवडे, जिल्हा अधक्षीक कृषी अधिकारी, गोंदिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here