पिंपळगाव/सडक येथील घटना
भंडारा : पत्नीपासून विभक्त होण्याकरिता न्यायालयात प्रकरण सुरू असताना पतीने चाकूने हल्ला करून पत्नीला गंभीर जखमी केले. सदर घटना 26 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास लाखनी तालुक्यातील पिंपळगाव/सडक येथे आयोजित शंकर पटाच्या कार्यक्रमात घडली. यावेळी नागरिकांनी धाव घेत आरोपी सुभाष जनार्दन हूमणे (35) रा. पुरकाबोडी ता. भंडारा याला चांगलाचे चोप दिला. तर जखमी पूजा (26) रा. मुंडीपार/सडक ता. लाखनी हिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
पूजा व सुभाष यांचे 2017 मध्ये लग्न झाले. दरम्यान, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करीत असे. या त्रासाला कंटाळून पूजा माहेरी आली होती. पतीच्या स्वभावात सुधारणा होण्याचे काहीच चिन्हे दिसत नसल्यामुळे तिने त्याच्याविरोधात न्यायालयात सोडचिठ्ठीकरिता प्रकरण प्रविष्ठ केले. त्यानंतर पुजाने गणेश संजय वैद्य रा. मुंडीपार/सडक यांच्याशी 16 जानेवारी 2022 मध्ये दुसरा विवाह केला. दरम्यान पुजा ही घराशेजारील महिला व चूलतसासू यांच्यासोबत 26 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता पिंपळगाव/सडकच्या शंकरपटावर गेली. यावेळी एका दुकानात खरेदी करीत असताना पूर्व पती सुभाष हुमने याने न्यायालयात सुरू असलेल्या सोडचिठ्ठीच्या कारणावरून चाकुने तिच्या हातावर, छातीवर वार करून गंभीर जखमी केले. जखमी पूजाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकरणाची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपी सुभाष हुमने याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात महिला पोलिस हवालदार सरिता कोटांगले करीत आहेत.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219