गोंदिया : आजचे बालक हे उद्याचे देशाचे भवितव्य आहेत. त्यामुळे आपली बालके निरोगी व सुदृढ राहण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने नियमीत लसीकरण करणे गरजेचे असून कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 10 जुलै रोजी नियमीत लसीकरण सक्षमीकरण व विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम 5.0 मोहिमेबाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, डॉ.साजिद (SMO) नागपूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.नितीन कापसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा पुरविण्यावर भर देण्यात यावा. प्रसुती झाल्यानंतर 24 तासाच्या आत बाळाला हिपॅटायटीस-बी लसीकरण देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी आरोग्य संस्थेमध्ये प्रसुती झाल्यानंतर बाळाला हे लसीकरण देण्याचे प्रमाण योग्य आहे. परंतु खाजगी नर्सिंग रुग्णालयात प्रसुती झाल्यावर बालकास हिपॅटायटीस-बी लसीकरण देण्याचे प्रमाण कमी असून ते वाढविणे गरजेचे आहे असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, गोवर रुबेला लसीकरण तसेच जपानीस एन्कफलायटिस लसीकरण वाढविण्यात यावे. शून्य ते दोन वर्ष आणि दोन ते पाच वर्ष वयातील लसीकरणापासून वंचित असलेले बाळ व ज्यांना वयानुसार लसीकरण लावण्यात आले नाही अशा बाळांचा शोध घेऊन मिशन मध्ये लसीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आपल्या जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये सर्व लसी मोफत दिल्या जातात. त्यामुळे आपण आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून आपल्या बाळाचे संपूर्ण लसीकरण करुन घ्यावे असे त्यांनी सांगितले.
विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम 5.0 मोहिमेअंतर्गत बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून पहिली फेरी दिनांक 7 ते 12 ऑगस्ट 2023, दुसरी फेरी 11 ते 16 सप्टेंबर 2023, तिसरी फेरी 9 ते 14 ऑक्टोबर 2023 दरम्यान लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ.साजिद यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती विशद केली. सभेला डॉ. बी.डी.जायसवाल, डॉ.संजय भगत, डॉ.निरंजन अग्रवाल, डॉ. वेदप्रकाश चौरागडे, डॉ.मनिष तिवारी, डॉ.सलील पाटील, डॉ.शुशांकी कापसे, डॉ.स्वाती घोडमारे, डॉ.ललित कुकडे, डॉ.विजय राऊत, डॉ.अमित कोडनकर, डॉ.प्रेमकुमार बघेले, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर, सहायक प्रकल्प अधिकारी श्रीमती आर.पी.मिश्रा उपस्थित होते.
बाळाच्या आरोग्यासाठी लसीकरण आवश्यक : चिन्मय गोतमारे
RELATED ARTICLES