Friday, July 19, 2024
Google search engine
HomeUncategorizedयंत्रणांनी तत्पर राहून निवडणुकीची कामे काळजीपूर्वक करावी : पर्वणी पाटील

यंत्रणांनी तत्पर राहून निवडणुकीची कामे काळजीपूर्वक करावी : पर्वणी पाटील

गोंदिया : मतदान केंद्रातील आवश्यक सोयी-सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या सर्व यंत्रणांनी तत्पर राहून निवडणुकीची कामे काळजीपूर्वक करावी, अशा सूचना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोंदिया पर्वणी पाटील यांनी दिल्या.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कामकाजाच्या दृष्टीने उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंदिया येथील सभागृहात सर्व नोडल अधिकारी, झोनल अधिकारी व सेक्टर अधिकारी यांची सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मार्गदर्शन करतांना श्रीमती पाटील बोलत होत्या. न.प.मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार विशाल सोनवणे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे, नायब तहसिलदार सर्वश्री रमेश पालांदूरकर, सीमा पाटणे, प्रकाश तिवारी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहे, त्याबाबत संबंधितांना प्रशिक्षण दिले जात आहे. निवडणूक विषयक नियमांचा अभ्यास करावा, जेणेकरुन निवडणूक काळात कोणत्याही चुका होणार नाही. प्रशिक्षणाचा फायदा फिल्डवर दिसला पाहिजे. नियमाच्या बाहेर कोणतेही काम होणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेली कामे आपले कर्तव्य समजून एकमेकांशी समन्वयाने काम करावे. निवडणूक विषयी गांभीर्य बाळगून जबाबदाऱ्या पार पाडाव्या. प्रत्येक मतदान केंद्रावर स्वच्छतागृह, पाणी व विजेची व्यवस्था असणे आवश्यक आहे. 24 जानेवारी 2024 रोजी मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. पोस्टल बॅलेटची प्रक्रिया या निवडणुकीत वेगळी राहणार असून 85 वर्षावरील नागरिकांना व दिव्यांगांना फॉर्म नं.12 डी नमूना देणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेत सर्व नोडल अधिकारी, झोनल अधिकारी व सेक्टर अधिकारी यांनी जबाबदारीने कामे करुन निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे शांत वातावरणात यशस्वीरित्या पार पाडावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

65-गोंदिया विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 11 हजार 57 मतदार आहेत. यामध्ये स्त्री मतदार 1 लाख 58 हजार 651 असून पुरुष मतदार 1 लाख 52 हजार 397 आहेत. दिव्यांग मतदार 2 हजार 27 आहेत. तृतीयपंथी मतदार 9 आहेत. सदर मतदारसंघात एकूण मतदान केंद्र 362 आहेत. पोलींग पार्टीला निवडणुकीचे साहित्य नेण्याकरीता शहरी भागात 20 मिनी बसेस व 4 जीपची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर ग्रामीण भागातील पोलींग पार्टीसाठी 26 एसटी बसेस व 6 जीपची व्यवस्था करण्यात आलेली आहे. एकूण झोनल अधिकारी- 41, बीएलओ- 361, पर्यवेक्षक- 36, मतदान पोलींग पार्टी- 400, अधिकारी व कर्मचारी- 2000 असणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. सभेला निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट सर्व नोडल अधिकारी, झोनल अधिकारी, सेक्टर अधिकारी यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments