नेहरु युवा केंद्रामार्फत पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन
गोंदिया : आजच्या युगात युवकांवर फार मोठी जबाबदारी असून शासकीय योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी सक्रीय पुढाकार घेऊन प्रयत्न करावे. युवकांनी आतापासूनच आपल्या भविष्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. स्वत:चा उद्योग सुरु करुन बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न करावे. युवकांनी आपले ध्येय निश्चित करुन पुढील वाटचाल करावी, असे प्रतिपादन शुभांगी मेंढे यांनी केले.
नेहरु युवा केंद्रामार्फत नुकतेच जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना श्रीमती मेंढे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य हेमंत आवारे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, महिला व बालकल्याण विभागाच्या केंद्र प्रशासक समिना खान, भौदिप शहारे, विनायक डोंगरवार, नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी श्रुती डोंगरे, लेखाधिकारी रमेश अहिरकर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना श्रीमती मेंढे म्हणाल्या, युवकांनी ध्येय व उद्देश निश्चित करुन आपले जीवन उज्ज्वल करावे. युवकांनी नोकरी मागणारे न होता, नोकरी देणारे बनले पाहिजे. प्रयत्न अंती परमेश्वर यालाच म्हणतात प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. विद्यार्थी जीवनात वेळेला फार महत्व आहे, कारण आलेली वेळ पुन्हा परत येत नाही. वेळेचा सदुपयोग करुन घेणे आवश्यक आहे. मिळालेल्या संधीचे सोने करणे आपल्याच हातात असते. महाविद्यालयात शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांनी जिद्द, कठीण परिश्रम व शिस्त या त्रिसुत्रीचा वापर केला तर विद्यार्थ्यांचे जीवन उज्ज्वल व्हायला वेळ लागणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध मुद्यांवर जसे- वोकल फॉर लोकल, नारी शक्ती व महिला सक्षमीकरण यावर मार्गदर्शन करण्यात आले. मॉक संसद कार्यक्रमाद्वारे संसदीय कार्यपध्दतीची तरुणांना एक्सपोजर प्रदान करण्यात आले. शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती तरुणांना देऊन त्याच्या परिणामावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास बघेले, दैव राऊत, पुनम दमाहे, पुजा डोंगरे, श्रध्दा शहारे, थानेश्वर सोनवणे, सतीश कुंभरे, निना गुप्ता, शुभम मेश्राम, अविनाश शिवणकर व ऋतुराज यादव यांनी अथक परिश्रम घेतले.
युवकांनी ध्येय निश्चित करुन पुढील वाटचाल करावी : शुभांगी मेंढे
RELATED ARTICLES