Tuesday, April 22, 2025
Google search engine
HomeUncategorizedस्थानिक लोकप्रतिनिधींनी शासन व आदिवासी यांच्यामधील दुवा म्हणून काम करावे : अपर...

स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासन व आदिवासी यांच्यामधील दुवा म्हणून काम करावे : अपर आयुक्त आदिवासी विकास रवींद्र ठाकरे

गोंदिया : आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासाच्या योजना ग्रामीण भागातील गरीब व गरजू आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासन व आदिवासी यांच्यामधील दुवा म्हणून काम करावे, असे आवाहन अपर आयुक्त आदिवासी विकास नागपूर रवींद्र ठाकरे यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी यांच्यातर्फे गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी जमाती प्रवर्गातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची बैठक अपर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. उपायुक्त आदिवासी विकास दशरथ कुळमेथे, प्रकल्प अधिकारी देवरी विकास राचेलवर यावेळी उपस्थित होते. प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आदिवासी कल्याणाच्या योजनांची माहिती पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे सांगून श्री. ठाकरे म्हणाले की, स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या भागातील व गावातील आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवावी व लाभ मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केले. यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालय आपणास सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रकल्प कार्यालयीन सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून विषयनिहाय सर्व शाखेतील प्रलंबीत प्रकरणांचा व प्रलंबीत पत्रव्यवहार यांचा आढावा व दप्तर तपासणी यावेळी करण्यात आली. प्रलंबीत प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्याच्या दृष्टीने कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना त्यांनी निर्देश दिले. आदिवासी समाज भवन, देवरी येथे प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधिक्षक, महिला अधिक्षीका तसेच शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतीगृहातील गृहपाल यांची संयुक्त सभासुद्धा श्री. ठाकरे यांनी घेतली. मागील दोन वर्षापासून आश्रमशाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमात किती विद्यार्थ्यांची प्रगती झाली याबाबतचा आढावा घेण्यात आला. यावर्षी सुध्दा पुन्हा एक नविन उपक्रम सुरु करीत असून यामध्ये उन्हाळी अभ्यासक्रम घेवून विद्यार्थ्यांचा शैक्षणीक दर्जा कसा वाढवता येईल यादृष्टीने ११ एप्रिल ते ९ मे २०२३ पर्यन्त उन्हाळी अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये (शासकीय व अनुदानित आश्रमशाळा) प्रथम टप्पा वर्ग ९ ते १२ सुरु करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यामध्ये शासकीय आश्रमशाळेतील वर्ग ९ ते १२ वी कला व विज्ञान शाखेचे सर्व विद्यार्थी ५ जून ते २५ जून २०२३ पर्यन्त सहभागी होतील असे त्यांनी सांगितले. बी.ए., एम.ए. व स्पर्धा परिक्षेची तयारी करत असतांना एवढ्यावरच समाधान न मानता इतर क्षेत्रामध्ये सुध्दा खूप मोठया प्रमाणात संधी असुन वैज्ञानिक, संशोधन, इंजिनिअर, डॉक्टर, इतर क्षेत्रात सुध्दा पुढे जाण्याचे आवाहन दशरथ कुळमेथे यांनी केले. आपल्याच शाळेत शिक्षण घेतलेला डॉ. भाष्कर हलामी, वरिष्ठ संशोधक, अमेरिका येथे कार्यरत आहे व गजानन भलावी, व्यवसायीक हे अत्यंत कठीण परिस्थीतीमधून ग्रामीण भागातुन उंच भरारी घेत आहेत. यांचेपासुन आदिवासी बांधवानी प्रेरणा घेवून विविध क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस सविता पुराम, सभापती महिला व बाल कल्याण जि.प गोंदिया, अंबीका बंजार सभापती पंचायत समिती देवरी, सविता कोडापे सभापती प.स सदस्य अर्जुनी मोरगाव, रजनी कुंभरे जि.प सदस्य जिल्हा परिषद गोंदिया, प्रमिला भलावी पंचायत समिती सदस्य तिरोडा, श्यामकला गावळ सदस्य पं.स. देवरी, वैशाली पंधरे पं.स.सदस्य, सुनिता दिहारी पं.स.सदस्य, ममता अंबादे सदस्य पं.स देवरी, डॉ.नाजूक कुंभरे पं.स.सदस्य, भाग्यश्री सयाम पं.स.सदस्य, शिला उईके नगरसेवक देवरी, हनवत वट्टी जि.प. सदस्य आमगाव, रितेशकुमार मलघाम सदस्य जि.प.गोंदिया, दिलीप जुडा ढिवरीटोला सरपंच तसेच यासह सर्व अनुसूचीत जमाती प्रर्वगातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी हरिश्चंद्र सरियाम यांनी सभेचे संचालन व आभार प्रदर्शन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments