गोंदिया : राज्यातील सन २०१९ च्या निवडणुकीत जनतेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले नव्हते. तेव्हा जनतेने विरोधात बसण्याचा जनादेश दिला होता. मात्र तेव्हा राज्याच्या विकासासाठी कट्टरवादी असलेल्या शिवसेनेशी (ठाकरे) आघाडी करुन सत्तेत सहभागी होण्यात काहीच गैर नाही वाटले नाही. मग आम्ही सुद्धा राज्याच्या विकासासाठी युतीत सहभागी झालो मग आता विरोध का केला जात आहे, असा सवाल खा. प्रफुल्ल पटेल यांनी विरोधकांचे नाव न घेता केला.
गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन गुरुवारी (दि.२४) नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खा. पटेल म्हणाले युतीत सहभागी होण्याचा निर्णय आम्हा एक दोन नेत्यांचा नव्हता तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. आजही आमच्या सोबत पक्षाच्या ५३ पैकी ४३ आमदार अधिकृतपणे व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाचा यावर निवडणूक आयोगाचा निर्णय लवकरच येणार असून त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटाची बाजू भक्कम आहे आणि कोणासोबत किती जण हे देखील स्पष्ट होईल असे देखील पटेल यांनी सांगितले.
मी निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा नाही हे वेळच ठरवेल
मी राज्यसभेचा सन २०२८ पर्यंत खासदार आहे. त्यामुळे २०२४ ची निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय मी आता जाहीर करणार नाही. आता आम्ही युतीत सहभागी झालो असून तिन पक्षांच्या बैठकीत जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. यावेळी जो उमेदवार ठरेल त्याच्या पाठीशी भक्कपणे उभे राहू. मी निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा नाही हे वेळच ठरवेल.
पवार आणि पटेल कुटुंब एकच
खा. शरद पवार यांच्याशी वैचारिक मतभेद असू शकतात. पण कौटुंबिक प्रेम आणि जिव्हाळा आजही कायम आहे व तो यापुढेही कायम राहिल. यात कसलीही कटुता येणार नाही कारण पवार आणि पटेल यांच कुटुंब एकच आहे. आ. रोहित पवार हे गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यामुळे वेगळीच चर्चा आहे. त्यांनी खुशाल या जिल्ह्यात यावे, त्यांनी माझ्याच घरी थांबावे. भलेही ते बाहेर जावून माझ्या विरोधात बोलले तरी मला चालले, याला माझी कसलीही हरकत नसणार असे खा. पटेल म्हणाले.