गोंदिया : गंगाझरी पोलिसांनी अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यात एकुण 09 गोवंशीय जनावरांची सुटका, गाई-बैल, महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण 6 लाख 40 हजारांचा रुपयाचा मुददेमाल जप्त केला.
सविस्तर असे की, आगामी कालावधीत येणारा गणेशोत्सव व इतर सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हददीत अवैधरित्या बेकायदेशीर धंदे करणा-यावर कारवाई करण्याचे तसेच जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरिता पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी याबाबत सर्व ठाणे प्रभारी यांना निर्देशित केले होते. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक (कॅम्प देवरी) अशोक बनकर यांच्या आदेशान्वये तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गंगाझरी पोलिसांनी अवैधरीत्या चालणाऱ्या धंदयाविरुध्द विशेष धाड मोहीम सुरु केली आहे.
या अनुषंगाने 08/09/2023 रोजी गंगाझरी पोलिसांना खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली की, एका महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये अवैधरित्या गोवंश जनावरांना कोंबून गंगाझरी मार्गे नागपूरकडे नेणार आहेत. त्या आधारे पो. स्टे. गंगाझरी येथील पोलिस गंगाझरी परिसरात गस्त करीत होते. दरम्यान रात्री 02.00 वाजताच्या सुमारास गोंदियाकडून तिरोड्याच्या दिशेने जाणारी एक महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच 35 ए जे 0916 ही जीप येताना दिसल्याने पोलिसांनी त्या वाहनाला थांबण्याचा इशारा केला. परंतु जीपच्या चालकाने जीप थांबविली नाही. म्हणून पोलिसांनी त्या जीपचा पाठलाग करून जीपला बरबसपुरा रेल्वे फाटकाजवळ थांबविले. परंतु जीपचा चालक जीप सोडून पळून गेला. पोलिसांनी त्या जीपची पाहणी केली असता, पोलिसांना सदर जीपच्या डाल्यामध्ये एकूण 09 गोवंश जनावरे मिळून आली. त्यातील एक जनावर मयत झालेले आढळून आले. सदर 09 गोवंश जनावरांची अवैधरीत्या कत्तलीकरिता निर्दयतेने, चाऱ्यापाण्याविना कोंबून बंदिस्त करून वाहतूक करीत असल्याची पोलिसांची खात्री झाल्याने पोलिसांनी सदरची जीप व त्यातील 09 गोवंश जनावरे असा एकूण 06 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. 08 गोवंशीय जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता गौशाळेत दाखल करण्यात आली.
सदर प्रकरणी महिंद्रा बोलेरो पिकअप चा चालक याच्याविरुध्द पोलीस ठाणे गंगाझरी येथे अप.क्र. 360/2023 भारतीय दंड विधान कलम 429 सह कलम 11(1), (ड)(इ) प्रा.छ.प्रति.अधि. सहकलम 5, 6, 9 महा. पशु संवर्धन अधि. 1967 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशन गंगाझरी येथील पोलीस करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक कॅम्प देवरी अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. महेश बनसोडे, पो.उप.नि. पराग उल्लेवार, स.फौ. मनोहर अंबुले, पो.हवा. भरत पारधी, श्यामकुमार देशपांडे, सुभाष हिवरे, चा.पो.हवा. बघेल, पो.शि. मारबदे, राखडे यांनी केली.