धान बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी : उपविभागीय कृषि अधिकारी रुपेश मेश्राम

0
160

गोंदिया : खरीप हंगामास सुरुवात झालेली असून बियाणे खरेदी करतांना चांगल्या उत्पादनासाठी तितक्याच दर्जेदार बियाणाची आवश्यकता असते. सध्या बाजारामध्ये विविध कंपन्या बियाणे विक्रीच्या जाहिराती देवून शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अशा जाहिरातींना बळी पडून शेतकऱ्याची फसवणूक होवू शकते.शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतीय बियाणे कायदा १९६६ लागू करण्यात आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणाची निवड करतांना कृषी विभागाशी संपर्क साधून नवीन सुधारित व संकरीत वाणाची माहिती घेवून परवानाधारक विक्रेत्या कडूनच बियाणे खरेदी करावे असे आवाहन देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री रुपेश मेश्राम यांनी केले आहे.
बियाणे खरेदी करतांना टॅगवर पिकाचे व जातीचे नाव,बियाणाचे प्रकारगट क्रमांक,उत्पादकाचे नाव,पत्ता,बीज परीक्षणाची तारीखबॅच नंबर,’उगवण शक्तीची टक्केवारी ,शुद्धतेचे प्रमाण,पिशवीतील बियाणाचे एकूण वजनविक्रीची किंमत असावी.विक्रेत्याची सही इत्यादी नोंदी तपासून पहाव्यात. बियाणे खरेदी करतांना खरेदीची पक्की पावती घ्यावी.त्यावर शेतकऱ्याचे नाव,पिकाचे नाव,प्रकार,बियाणाची जात,व विक्रेत्याची सही इत्यादीची नोंद करून घ्यावी. मुदत बाह्य तसेच पकिंग फोडलेले बियाणे खरेदी करू नये.भविष्यात जर बियाणात काही दोष आढळला तर तक्रार करतांना या सर्व गोष्टी उपयोगी पडतात. त्याशिवाय तक्रार ग्राह्य मानली जात नाही. खरेदी केलेले बियाणे वापरण्यापूर्वी पिशवीच्या खालच्या बाजूला छिद्र पडून बियाणे बाहेर काढावे. पिशवी वरील टॅग न काढता रिकामी पिशवी आणि त्यामध्ये थोडेसे बियाणे शिल्लक ठेवून खरेदी केलेली पावती जपून ठेवावी. बियाणाची उगवण क्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता व उत्पादक कंपनी यांच्यावर बियाणे कायदा १९६६ मधील कलम १० नुसार कायदेशीर कार्यवाही होवू शकते.बियाणे विषयी काही तक्रार असल्यास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ,कृषी विकास अधिकारी याचे कडे लेखी तक्रार द्यावी. कमी दर्जाच्या बियाणामुळे आर्थिक नुकसान झाले असल्यास जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवून नुकसान भरपाई मागता येते. अधिक माहिती करिता कृषि विभागाच्या क्षेत्रीय पातळीवर काम करणारे कृषि सहाय्यककृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारीतालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here