भौतिकशास्त्राचा पेपर फुटला ही बातमी धादांत खोटी, असला कोणताही अनुचित प्रकार देवरी येथे घडला नाही

0
194

गोंदिया :  17 फेब्रुवारी 2025 रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या भौतिकशास्त्राच्या पेपरच्यावेळी देवरी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर उत्तर पत्रिकेची झेरॉक्स बाहेर आली असल्याची बातमी एका मराठी वृत्तपत्रात दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी प्रकाशित झाली असून या बातमीत कोणतेही तथ्य नसून असला कोणताही अनुचित प्रकार देवरी तालुक्यातील तीन पैकी एकही परीक्षा केंद्रावर घडला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या एका मराठी वृत्तपत्रात पहिल्या पानावर छापून आलेल्या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यात आली असून देवरी तालुक्यातील तीनही परीक्षा केंद्रावर महसूल विभागाचे बैठे पथक, नियमीत पोलीस व होमगार्ड सुरक्षा रक्षक, शिक्षण विभागाचा सहाय्यक परीक्षक व संबंधित तिन्ही परीक्षा केंद्रांचे केंद्र संचालक यांचा लेखी अभिप्राय घेण्यात आलेला असून त्यानुसार तिनही परीक्षा केंद्रात असा कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा बातमीकडे विद्यार्थी व पालकांनी लक्ष न देता पुढील परीक्षेवर आपले लक्ष केंद्रीत करावे असेही यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी विद्यार्थी व पालकांना आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here