गोंदिया : तिसर्या वर्गात अध्ययनरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेची जीर्ण झालेली स्लॅब (छत) कोसळल्याने तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवार (ता.2 ) दुपारच्या सुमारास घडली. यात एका विद्यार्थ्याच्या डोक्याला व हाताला जखम झाली असून दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. लखन नरेश रहांगडाले असे डोक्याल्या जखम झालेल्या व चेतन रामेश्वर कावळे, महेन महेंद्र सोनवाने इयत्ता 3 री असे किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
गोरेगाव तालुक्यातील हिरापूर ग्राम पंचायत अंतर्गत साईटोला येथे जिल्हा परिषदेची इयत्ता 1 ते 4 पर्यंत शाळा असून 11 मुले व 5 मुली असे 16 विद्यार्थी अध्ययनरत आहेत. तर या विद्यार्थ्यांमागे एकच शिक्षक देण्यात आले असून मुख्याध्यापक पदाची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. त्यातच शाळेत एका षटकोनी इमारतीसह दोन जुन्या जिर्ण इमारती आहेत, जे कधीही जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे, सर्व इयत्ता 1 ते 4 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना षटकोनी इमारतीत बसविण्यात येते. तर ही इमारतही जिर्णावस्थेत आहे. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास इयत्ता तिसरीचे सहा विद्यार्थी मुख्याध्यापक रविंद्र अटरे यांच्या जवळ उभे राहून शालेय गणवेश पाहत असताना त्यांच्या अंगावर अचानकच स्लॅब (कॉंक्रीट) कोसळला त्यामुळे लखन रहांगडाले या विद्यार्थ्याच्या डोक्याला व उजव्या हाताला दुखापत झाली. तर इतर दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. यावेळी मुख्याध्यापक अटरे यांनी जखमी विद्यार्थ्यांना स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन जात प्रथमोपचार केले व विद्यार्थ्यांना घरी पाठवले. मात्र, सदर जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय किंवा पुढील उपचारासाठी इतरत्र हलविण्यात आले नाही. त्यामुळे पालकवर्गात प्रचंड संताप पसरलेला आहे. तर चार वर्ग असूनही विद्यार्थ्यांना बसण्यासाठी इमारत नसल्याने जोपर्यंत नवीन इमारतीचे निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नाही, व शाळेला कुलूप लावण्याचा इशारा पालक व गावकऱ्यांनी दिला आहे.






