गडचिरोली : गडचिरोली पोलिस दल व मैत्री परिवार संस्था नागपूरच्या संयुक्त विद्यमाने आज २६ मार्च रोजी शहरातील मूल मार्गावरील अभिनव लॉनमध्ये पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळय़ात ८ आत्मसर्मपित नक्षल्यांसह तब्बल १२७ आदिवासी जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला. या सामुहिक विवाह सोहळय़ामुळे गडचिरोली शहरत गजबजून गेले होते. या विवाह सोहळयात चार हजार वर्हाडी उपस्थित झाले होते.
पोलिस दलाकडून आदिवासींच्या उत्थानासाठी दादालोरा खिडकी या उपक्रमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. मागील वर्षी सामुहिक सोहळय़ात ११७ जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले होते. तर यावर्षी ८ आत्मसर्मपित नक्षल्यांसह १२७ जोडप्यांचा विवाह लावून देण्यात आला. कार्यक्रमाला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, पोलिस विभागाचे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ. संदीप पाटील, आयुक्त राजकमल, मैत्री परिवार संस्था नागपूरचे अध्यक्ष संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंढके, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनुज तारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आमदार डॉ देवरावजी होळी, आमदार कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिलडा व मैत्री संस्थेचे पदाधिकारी व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी आदिवासी गोंडी समाजाच्या पुरातन चालीरिती व परंपरेनुसार सकाळी ९ वाजता शहरातून पारंपरिक पद्धतीने मूल मार्गावरील मंगल कार्यालयातून वरातील सुरुवात झाली. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर वरात मुख्य बाजारपेठेतून इंदिरा गांधी चौकातून पुन्हा लग्नमंडपात पोहोचली. या निघालेल्या वरातुमळे गडचिरोली शहर गजबूजून गेले होते. ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या वरातीवर महिलांनी घराबाहेर पडून कौतुकाने वधू-वरांवर पुष्पवृटी केली. वरातील नातेवाईकांसह पोलिसांनीही ठेका धरला होता.
जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य
पोलिसांनी आज पार पडलेल्या सामूहिक विवाह मंडप, जेवण व वधू-वरांचा राहण्याचा व येण्या-जाण्याचा खर्च उचलला होता. तसेच मैत्री परिवार संस्थेतर्फे वधूला डोरले, मंगळसूत्र, वधू-वरांना नवे कपडे, संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. जोडप्यांच्या आई-वडिलांना आहेर देण्यात आला. तसेच जोडप्यांना विवाह प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.