गोंदिया : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये निवडणूक लढणारे उमेदवार व राजकीय पक्षांनी वेळोवेळी केलेल्या निवडणूक खर्चाची माहिती निवडणूक खर्च शाखेला वेळेत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हाधिकारी निवडणूक किरण अंबेकर, नोडल अधिकारी खर्च जनार्धन खोटरे व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार व राजकीय पक्ष यांच्याकडून होणाऱ्या खर्चाचा हिशोब नोडल अधिकारी खर्च यांच्या चमू मार्फत नोंदविला जातो. जिल्हाधिकारी यांनी आज या संबंधीचा आढावा घेतला. निरिक्षक निवडणूक खर्च यांना प्रत्येक खर्च वेळेत सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसतशी प्रचाराची गती वाढणार आहे. ही बाब लक्षात घेता खर्च नोंदविणाऱ्या विविध चमूनी सक्रिय होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सभा उशिरा असल्यास त्याचा खर्च दुसऱ्या दिवशी नोंदविणे आवश्यक आहे. मात्र त्याला फार विलंब होता कामा नये अशा सूचनाही त्यांनी केल्या. राजकीय पक्ष व उमेदवार यांच्या खर्चाच्या बाबतीत काटेकोरपणे नोंदी घेणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, प्रत्येक सभेचे व्हिडीओ चित्रीकरण केले गेले पाहिजे. याबाबतीत हयगय होता कामा नये. उमेदवाराने राजकीय सभेचा सादर केलेला खर्च व व्हिडीओ चित्रीकरण याचा ताळमेळ करून घ्यावा असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे उमेदवाराने प्रचारासाठी छापलेले पॉम्प्लेट व वर्तमानपत्रात प्रसारित केलेल्या जाहिराती याचाही खर्च वेळच्यावेळी नोंदविण्यात यावा. निवडणूक खर्च निरिक्षक या बाबींचा नियमित आढावा घेत असून त्यांच्याकडे सर्व बाबी अचूकपणे जातील याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगितले. सर्व संबंधीत नोडल अधिकारी यांनी निवडणूक खर्चाबाबतचे तपशील काळजीपूर्वक तपासूनच निवडणूक खर्च नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करावेत. राजकीय पक्ष व उमेदवार यांनी सुद्धा आपला निवडणूक खर्च वेळेत सादर करावा असे आवाहन त्यांनी केले. याबाबतीत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. या बैठकीत अन्य विषयांवरही चर्चा करण्यात आली.
निवडणूक खर्चाची माहिती वेळेत सादर करा : जिल्हाधिकारी प्रजित नायर
RELATED ARTICLES