गोंदिया : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणाऱ्या आरोपी पती रणजित ऊर्फ काल्या भीमराव राऊत (२९, रा. चुरडी) याला तदर्थ-१, अतिरिक्त सत्र न्यायालयालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही सुनावणी २७ मार्च रोजी तदर्थ-१, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. बी. लवटे यांनी केली. तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील रंजित भीमराव राऊत याच्यासोबत भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील हिरालाल रघुनाथ चचाने यांची मुलगी सपना हिचा २६ मे २०१९ रोजी विवाह झाला होता. २७ मे रोजी मुलगी सपना व जावई रंजित हे चुरडी, ता. तिरोडा येथे गेले. २८ मे रोजी ते दोघेही मांडवपरतणीसाठी पालोरा गेले होते. दोन दिवस राहिल्यावर ३० मे २०१९ रोजी रंजितसोबत सासरी चुरडी येथे जाण्याअगोदर सपना हिने चुरडीला जाण्यास नकार दिला होता. रंजित मारून टाकेल, असे सपना म्हणाली होती; परंतु त्या गोष्टीला गंमत समजून चुरडी येथे पाठविले होते. लगेच १ जून २०१९ रोजी पहाटे ३ वाजता सपनाचे वडील भीमराव राऊत यांना सपनाचा मृत्यू झाल्याचा फोन आला.
रंजित भीमराव राऊत याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा टॉवेलने गळा आवळून खून केला. या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी ३०२, ३०९, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास गवते यांनी केला. न्यायालयात जिल्हा सरकारी वकील एम. एस. चांदवानी यांनी फिर्यादीची बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी सहायक फौजदार शंकर साठवणे यांनी सहकार्य केले.या प्रकरणात न्यायालयासमोर ११ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात सासू खेलन भीमराव राऊत व दुर्गा संदीप राऊत (रा. चुरडी) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दोघींची कलम २३५ (१) सीआरपीसी अन्वये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.