दुषित पाणीपुरवठा सुरूच
समस्या मार्गी लावण्यात मजिप्राच्या कर्मचारी अपयशी
जलजन्य आजाराचा धोका वाढला
गोंदिया : शहरातील प्रभाग क्र.२०/२१ अंतर्गत येणार्या शास्त्री वॉर्ड येथे मागील आठवडाभरापासून दुषित पाणी पुरवठा होत आहे. या संदर्भात येथील नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे लक्ष वेधले होते. यावर मजिप्राचे कर्मचारी आले आणि दुषित पाणी पुरवठ्याची तपासणी करून गेले. पण दूषित पाणी पुरवठा कशाने होत आहे? याचा शोध घेण्यात अपयश आल्याने आजघडीला शात्री वॉर्डात पाणी पेटले आहे. मागील दोन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी चांगलाच हाहाकार उडाला आहे. यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने शहरात सकाळ व सायंकाळ अशा प्रकारे दोन वेळेत पाणी पुरवठा केला जातो. मात्र जेमतेम उन्हाळा सुरू होताच शहरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यातही एक वेळ पाणी पुरवठा होत आहे. शास्त्री वॉर्डमध्ये मागील आठ दिवसांपासून पाण्याची समस्या भिषण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा सुरू आहे. पाणी एवढे दुषित असल्याने वापरण्यायोग्यही नाही. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांची वणवण सुरू आहे. दुषित पाणी पुरवठ्याला घेवून येथील सुज्ञ नागारिकांनी तक्रारही केली. दरम्यान मजिप्राचे कर्मचारी पाणी गुणवत्ता तपासणीसाठी आले. ८ ते १० कर्मचार्यांनी पाणी तपासणी करून नागरिकांनी पाणी पिऊ नये, असा सल्लाही दिला. या बाबीला ५ ते ६ दिवसांचा काळ लोटला आहे. पण दुषित पाणी पुरवठा होण्यामागचे कारण काय? या शोध लावण्यास कर्मचारी अपयशी ठरले. यामुळे समस्या कायम असून आजघडीला येथील नागरिक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यातल्यात्यात मागील दोन दिवसांपासून पाणी पुरवठा पूर्णत: खंडीत झाल्याने पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जनप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत करून समस्या मार्गी लावावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
बालकांच्या आरोग्यावर परिणाम..
मागील १० ते १५ दिवसांपासून दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा होत आाहे. यामुळे शास्त्री वार्डातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. सर्वाधिक परिणाम लहान बालकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. येथील ५ ते ६ बालक आजारी पडले आहेत. पोटदुखी, अतिसार आजाराची लागण झाली आहे. याला दूषित पाणीचे कारणीभूत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. यावर लवकरच उपाययोजना करण्यात आली नाही तर जलजन्य आाजार परसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
पाण्याची नासाडी…..
पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी आलेल्या कर्मचार्यांनी पाईपलाईनमध्ये कचरा अथवा गाळ असावी, याकरीता दूषित पाणी पुरवठा होत आहे, असे गृहीत धरून शेवटच्या भागातून पाईप लाईन खुली केली. तीन दिवस पाईप लाईन सुरू असल्याने लाखो लीटर पाणी वाहून गेले. दरम्यान रविवारी पाईपलाईन बंद करण्यात आली. पण समस्या काही मार्गी लागली नाही. यामुळे बंद पाईपलाईन पुन्हा खुली करण्यात आली आहे. यामुळे सोमवारपासून लाखो लीटर पाण्याची नासाडी सुरू आहे.
बोरवेलही नांदुरूस्तच, टँकरने पाणीपुरवठा
दुषित पाणी पुरवठा आणि बंद पडून असलेली बोरवेल यामुळे समस्येत आणखीच भर पडली. परिणामी नागरिक दूषित पाण्यावरच गरज भागविण्यास बाध्य झाले आहेत. पण सोमवारपासून पाणी पुरवठा ठप्प पडल्याने पाण्यासाठी एकच तारांबळ उडाली. दरम्यान काही सुज्ञ नागरिकांनी न.प.ला माहिती दिली असता टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला.