गोंदिया. अर्जुनी मोरगांव पंचायत समितीची नवीन इमारत तीन वर्षापासून बनवून तयार आहे. तीन कोटी रुपये निधीतून इमारत रंगरंगोटी करून सुसज्ज उभी आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून विद्युत जोडणी अभावी या इमारतीचे लोकार्पण होऊ न शकल्याने सध्या ही सुसज्ज इमारत धूळखात पडली आहे.
अर्जुनी मोरगाव पंचायत समितीची स्थापना सन 1962 ला करण्यात आली. तेव्हापासून इंग्रजकालीन असलेल्या इमारतीमध्ये तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. इमारत पूर्णता जर्जर झाली असताना ठिकठिकाणी या इमारतीला गळती सुद्धा लागली होती. मागील चार-पाच वर्षापासून जुन्या इमारतीला प्लॅस्टिकचा आधार घ्यावा लागत होता. अशा परिस्थितीतही पंचायत समितीचे कामकाज सुरू होते .दरम्यान अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार व माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे विशेष पुढाकाराने तीन-चार वर्षांपूर्वी पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामासाठी 3 कोटी 70 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. या नवीन इमारत बांधकामा चे भूमिपूजन सुद्धा माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर पंचायत समितीच्या जुन्या इमारतीला पाडून नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. जुनी इमारत पडल्यानंतर पंचायत समितीचा संपूर्ण कामकाज पंचायत समितीच्या मागच्या बाजूला असलेल्या लहान मोठ्या खोल्यांमध्ये तर बचत भवन व उमेद च्या कार्यालयात हलविण्यात आले. तर सभापती उपसभापती व सदस्यांसाठी स्वच्छता गृह नसलेल्या जुन्या षटकोणी इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात आली. आज पावसाळ्याचे दिवस असताना अनेक विभागातील खोल्यांमध्ये पावसाची गळती सुरू आहे. सुसज्ज अशा नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्षाचा कालावधी लोटला आहे मात्र विद्युत जोडणीचे काम अद्यापही शिल्लक आहे. परिणामी सदर नवीन इमारतीचे लोकार्पण होऊ शकले नाही केवळ विद्युत जोडणी अभावी तीन कोटीची ही नवीन इमारत तीन वर्षापासून धुळखात पडली असून लोकार्पणाचा मुहूर्त केव्हा निघणार असा प्रश्न निर्माण झाला आहे
पंचायत समितीची निवडणूक होऊन आज दीड वर्षाचा कालावधी झाला. नवीन इमारत बनून तीन वर्ष झाली .आम्ही दीड वर्षांपूर्वी पहिल्याच सभेत नवनिर्मित पंचायत समिती इमारतीच्या विद्युत जोडणी संदर्भात व लोकार्पण संदर्भात ठराव जिल्हा परिषद कडे पाठविले व सतत पाठपुरवठा करीत आहोत. कुणीतरी गोंदिया येथील कंत्राटदाराला विद्युत जोडणीचे कंत्राट झाले असल्याची माहिती आहे. लगेच वीज जोडणी चे काम झाल्यावर लोकार्पण करू. होमराज पुस्तोडे उपसभापती पंचायत समिती अर्जुनी मोरगाव.
अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या नवनिर्मित इमारतीच्या वीज जोडणीचे टेंडर झालेले आहेत. व लगेच करारनामा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वीज जोडणीचे काम येत्या चार-पाच दिवसात सुरू करण्यात येईल. व लगेच लोकार्पण सुद्धा करू. यशवंत गणवीर उपाध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया.