शासन आणि प्रशासनाने मिळून कचारगड यात्रेचे समन्वय साधावे : आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके

0
198

गोंदिया : आदिवासींचे दैवत असलेली कचारगड यात्रा दि.30 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात आयोजित असून ही यात्रा सुरळीत व्हावी, जिल्ह्याचे नाव आणि राज्याचे नाव यानिमित्ताने देशपातळीवर सन्मानाने घ्यावे, यासाठी शासन आणि प्रशासन मिळून कचारगड यात्रेचे यशस्वी नियोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी आज यात्रेसंदर्भात आढावा बैठकीत दिले.
नियोजन भवन सभागृहात आयोजित बैठकीत आदिवासी विकास मंत्री श्री. उईके बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, सर्वश्री आमदार संजय पुराम, विनोद अग्रवाल, मिलिंद नरोटे (गडचिरोली), कोसमतर्रा ग्रामपंचायत सरपंच सिंधू घरत, जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्री. उईके म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात असलेले आदिवासींचे दैवत कचारगड मधील ‘पारी कोपार लिंगो’ यांच्या दर्शनासाठी माघ पौर्णिमेला सुरू होत असलेल्या 5 दिवसीय यात्रा शांततेत,  समन्वयाने आणि सन्मानपूर्वक व्हावी यासाठी सर्व यंत्रणांनी आपली भूमिका बजावावी असे आवाहन केले. या ठिकाणी केंद्र शासनाचे तसेच इतर राज्यांचे अतिविशिष्ट व्यक्ती दर्शनासाठी येणार आहेत. कचारगड हा भाग घनदाट जंगलाचा असल्यामुळे पोलीस विभागाकडून योग्य बंदोबस्त करावा, रात्रीच्या वेळी सुरक्षेची व्यवस्था असावी, सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था असावी, यासह तात्पुरती रस्त्याची डागडूजी, देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गाचे बॅरिकेटिंग, वाहतूक व्यवस्था, आगार व्यवस्थापकाकडून शासकीय बसेसच्या फेऱ्या जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागाकडून वाढवावे, नियंत्रण कक्ष, पब्लिक अॅड्रेस सिस्टम, लाऊड स्पीकर, वाहन तपासणी, पार्किंगची व्यवस्था, इमर्जन्सी व्हेईकल पासेसची व्यवस्था करण्यात यावी, यासह अतिविशिष्ट व्यक्तींचे आगमनाच्या वेळी त्यांचा राजशिष्टाचार याबद्दलच्या सूचना अशोक उईके यांनी यावेळी दिल्या. प्राथमिक सुविधेमध्ये आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, थांबणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था, महाप्रसाद भोजन वितरण जिल्हा प्रशासनाकडून योग्यरीत्या करण्यात यावे.

आपात्कालीन सुविधा अंतर्गत या ठिकाणी जागोजागी माहिती, मार्गदर्शक नकाशे, मार्गीकाचे चिन्हांकित असावे अशी सूचना केली. सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, मदत केंद्र रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन, सर्व महत्वपूर्ण अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, आपात्कालीन वेळी वाहनांसाठी मोकळा मार्ग अशा सुविधाही यात्रेपूर्वी तयार असण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच वन्यजीव प्राणी संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाकडूनही सहकार्य लाभावे अशा सूचना दिल्या. या ठिकाणी विविध सेवाभावी संस्थांकडून भोजनदानाचे आयोजन केले जाते, ते करीत असतांना सेवाभाव ठेवून काम करावे तसेच शासनाला सहकार्य करावे असेही श्री. उईके यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here