भंडारा : तुमसर शहरातील सराफा व्यापारी संजय चिमनलाल सोनी त्यांची पत्नी पूनम संजय सोनी व त्यांचा मुलगा दृमिल संजय सोनी यांच्या हत्येप्रकरणी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने सात जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हा निर्णय दुपारी तीन वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांनी सुनावला. हत्याकांडानंतर तब्बल नऊ वर्षानंतर या प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेल्यांमध्ये शहानवाज उर्फ बाबू सत्तार शेख (३२), महेश सुभाष आगासे (३५), सलीम नजीम खा पठाण (३४), राहुल गोपीचंद पडोळे (३२), मोहम्मद अफरोज उर्फ सोहेल युसुफ शेख (३४), शेख रफिक शेख रहमान (४५) व केसरी मनोहर ढोले (३४) अशी नावे आहेत. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती.
२५ फेब्रुवारी २०१४ च्या मध्यरात्रीच्या सुमारास तुमसर येथे प्रतिष्ठित सराफा व्यवसायिक संजय चिमणलाल रानपुरा (सोनी (४७), त्यांची पत्नी पूनम संजय रानपुरा (४३) व त्यांचा मुलगा दुर्मिह संजय रानपुरा (१२) यांची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर अवघ्या २४ तासात तुमसर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यापैकी एकाला मुंबईतून अटक करण्यात आली होती. हत्येनंतर आरोपींनी ८.३ किलो सोने चांदीचे दागिने व ३९ लक्ष रुपयांची रोख चोरून नेली होती. गळा आवळून खून केल्यानंतर लूटपाटीच्या घटनेला अंजाम देण्यात आला होता.
असा घटना होता हत्याकांड
२५ फेब्रुवारी रोजी संजय सोनी यांचा एका वाहन चालकाला दूरध्वनी आल्यावर त्याने इतर साथीदारांसह या घटनेचा कट रचला. यासाठी त्याने नागपूर येथील ६ तरुणांना सोबत येण्यास सांगितले होते. २६ फेब्रुवारीला याच कार चालकाला सोबत घेऊन संजय सोनी सराफा व्यवसायानिमित्त गोंदियात आले व रात्रीच तुमसरला परत जातांना या कार चालकाने तिरोडाजवळील बिरसी फाटा येथे लघवी करण्याच्या बहाण्याने कार थांबविली. दरम्यान, येथे पूर्वसूचनेनुसार उपस्थित असलेले ३ तरुण पल्सर मोटारसायकलने पोहचलेले होते. हे तिथे आपले मित्र असल्याचे सांगून कारचालकाने त्यांना मारुती कार (क्र. एम. एच. ३६ एच १८३६) मध्ये तुम्सपर्यंत येणार असल्याचे सांगून बसवून घेतले होते.
त्या तिघांनी गाडीत बसताच नॉयलॉनच्या दोरीने संजय सोनी यांचा गळा आवळून गाडीतच त्यांची हत्या केली व त्यांच्या घरासमोर जाऊन हार्न वाजविल्यावर संजय सोनी यांची पत्नी पूनम व मुलांनी घराचे दार उघडले. सोबतचे लोक कोण आहेत, असे कारचालकाला विचारल्यावर, वाटेतच भोवळ आल्याचे सांगून यांच्याच मदतीने साहेबांना घरी आणले असल्याचे सांगून एक ग्लास पाणी आणायला सांगितले. त्या तिघांनी घरी पोहोचल्यानंतर प्रथम मुलगा मिलची नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या करून पूनम सोनी यांना तिजोरीची चावी मागितली व नंतर त्यांचीही गळा आवळून हत्या केली. यानंतर तिजोरी उपडून त्यांतील दागदागिने घेऊन मारुती कारने त्यांनी पळ काढला. तुमसर जवळील मिटेवाणी मार्गावरील हमारा हिंगणा येथील शेतशिवारात लुटलेल्या मालाची वाटणी करून रामटेक मार्गे सर्वांनी पळ काढला, नागपूर येथील दोघांनी आपल्या ताब्यातील मारुती कार रामटेकजवळील खिंडशी जंगलातील झुडपात लपवून ठेवली होते. या प्रकरणात सात जणांना कोठडी झाली होती. आता न्यायालयाने आज अंतिम निर्णय दिला.