उमेद अंतर्गत कर्जफेडीत गोंदिया जिल्हा राज्यात अग्रेसर : जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर

0
160

गोंदिया : उमेद अंतर्गत कर्जफेडीत गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम असल्याची माहिती आज जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दिली. गोंदिया जिल्ह्यातील महिलांनी बचत गटाअंतर्गत घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे प्रमाण राज्यात अव्वल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने दि.17 ते 21 फेब्रुवारी 2026 दरम्यान ‘पलाश’ मिनी सरस भव्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनीचे मंगळवारी उद्घाटन झाले. आज इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर उपस्थित होत्या.
भेंडारकर पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या लखपती दीदी उपक्रमाच्या माध्यमातून उमेद अंतर्गत जिल्ह्यात वार्षिक एक लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या महिलांची संख्या 1 लाख 47 हजार 225 आहे. नवीन उद्योजक तयार करण्यामध्ये सुध्दा गोंदिया जिल्हा राज्यामध्ये अग्रेसर असून आजपर्यंत नवीन बिगरशेती आधारित 14 हजार 350 उद्योजक तयार करण्यात आलेले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. गोंदिया जिल्ह्यात वसंत ऋतु मध्ये पलाशची फुल मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे या  मिनी सरस ला  ‘पलाश’ नाव देण्यात आलेले आहे. पलाश मिनी सरसमध्ये ग्रामीण भागातील 125 स्वयं सहायता समूह सहभागी झालेले आहेत. यामध्ये ऑनलाइन शॉपिंगची सुध्दा सोय करण्यात आलेली आहे. 9503736503 या व्हाट्सॲप नंबरवर मेसेज केल्यास आपल्या घरी आपल्याला आवश्यक असणाऱ्या 1500 रुपये किमतीच्या वस्तू घरपोच मिळतील. याशिवाय पलाश मिनी सरस मध्ये अनेक कुपनचीही व्यवस्था केलेली आहे. प्रदर्शनी दरम्यान एका स्टॉलवरून 500 ते 1500 रुपयेच्या खरेदीवर 5 % सूट तर 1501 रुपये अधिक किमतीची खरेदी केल्यास 7 % सूट देण्यात येत आहे. सदर प्रदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार असून या सुवर्ण संधीचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here