दुसर्‍याला फसवायला गेले अन् स्वतःच अडकले

0
366

सालेकसा पोलिसांनी केले दोघांना अटक
गोंदिया : शेजारील कुटूंबियांना फसविण्यासाठी खेळलेल्या खेळीत स्वतःच दोन भावंड अडकल्याची घटना सालेकसा तालुक्यातील सोनपुरी येथे समोर आली. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी दोन्ही भावंडांना अटक केली असून शिवकुमार नागपुरे व रामकुमार नागपुरे अशी आरोपींची नावे आहे.
सोनपुरी येथील शिवकुमार नागपुरे यांनी त्यांच्या घराचे दार तोडून रोख रक्कमेसह सोन्याचांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 35 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची तक्रार 13 मे रोजी सालेकसा पोलिस ठाण्यात केली होती. पोलिस निरीक्षक भूषण बुराडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपासकार्य सुरु केले. श्‍वासन पथक व फिंगरप्रिंट तज्ञांना पाचारण केले. तसेच घटनास्थळावरील भौतिक अवस्था लक्षात घेत शिवकुमार नागपुरे याचा भाऊ रामकुमार नागपुरे याला संशयाच्या आधारे ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने शिवकुमार याच्यासोबत चोरीचा बनाव केल्याची कबुली दिली. तसेच शेजारी राहणार्‍या कुटूंबाला खोट्या प्रकरणात अडकविण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही कबुली दिली. यावरुन दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक भूषण बुराडे, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस कर्मचारी विठ्ठल ठाकरे, इंद्रजीत बिसेन, दुर्गेश तिवारी, लक्ष्मण बंजार, मयुरी नागदिवे, रामेश्‍वर राऊत, निलेश जांभूळकर, विकास वेदक, विकास हेमणे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here