शास्त्री वॉर्डात एकाच घरातून निघाले ३९ साप

0
211

गोंदिया : शहरातील शास्त्री वॉर्ड परिसरात असलेल्या एका घराच्या दरवाजाची चौकट खोदत असताना एक-दोन नव्हे तर चक्क ३९ साप एकामागून निघाले. सापांची ३८ पिल्ले बाहेर येताना पाहून बघणारे सर्वच पुरते हैराण झाले.
याबाबत माहिती देताना घरमालक राजेश सीताराम शर्मा यांनी सांगितले की, हे घर सुमारे २० वर्षे जुने आहे. मुख्य दरवाजाची लाकडी चौकट कुजली होती. रविवार, ९ एप्रिल रोजी घराची साफसफाई करत असताना मोलकरणीला एक लहान साप दिसला, त्याला सुखरूप पकडून घराबाहेर काढण्यात आले. दरम्यान, दरवाजाच्या चौकटीच्या तडामध्ये तीन ते चार मुंडके दिसल्याने सापांची संख्या जास्त असेल या भीतीने सर्पमित्र बंटी शर्मा यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सोमवार, १० एप्रिल व मंगळवार, ११ एप्रिल रोजी बचाव मोहिमेदरम्यान एकूण ३९ सापांची पिल्ले सुखरूप पकडून बाहेर काढण्यात आली. एक प्लास्टिक बॉक्समध्ये त्यांना ठेऊन त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात आले. सर्पमित्र बंटी शर्मा यांनी सांगितले की, पकडलेली सर्व ३९ सापांची पिल्ले अलुकिल्बेक (तास्या) साप प्रजातीची आहेत. हे साप विषारी नसतात. साधारणपणे अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यावर मादी साप त्या ठिकाणाला सोडून निघून जाते. वास्तविक शास्त्री वॉर्डातील या घराच्या अंगणात जुनी नाली होती, ती वापरात नव्हती. दरवाजाच्या चौकटीत एक पाइप होता तो जमिनीत शिरला होता. त्यामुळे सापांच्या पिल्लांना किडे-माकोडे सहज खायला मिळायचे आणि या अन्नासाठी त्यांनी या चौकटीला आपली छावणी बनवली. सर्पमित्रांनी दरवाजाच्या चौकटीत साप दिसल्यावर हळूहळू चिमट्याने सुखरूप बाहेर काढले असता आतून अनेक साप बाहेर येऊ लागले. हे साप दोन आठवड्यांपूर्वीच जन्माला आले असावेत, असे सर्पमित्र सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here