गोंदिया : राज्यभरातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या रास्त मागण्यांकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत,शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी नितेश खोब्रागडे व शेतकऱ्यांनी १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपासून गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शासनाला दिला आहे. निवेदनात शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी वाढल्या असून, शेतकऱ्यांना जिवन जगणे कठीण झाले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचून गेलेला आहे. यासाठी शासनाने छत्तीसगड राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या ठोकळ ( मोठ्या)धानाला प्रति क्विंटल ३,१०० रुपये भाव द्यावा आणि एकरी २० क्विंटल धान खरेदीची मर्यादा वाढवावी.ही प्रमुख मागणी असून जोपर्यंत हा निर्णय लागू होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे नमुद केले आहे.
त्याचप्रमाणे वाणांनुसार प्रति क्विंटल ५,००० ते ७,००० रुपये दर जाहीर करावा,शेतीकामासाठी रोजगार हमी योजनेतून एकरी १५,००० रुपयांचे अनुदान द्यावे.शेतीसाठी २४ तास मोफत वीज आणि सिंचनासाठी मोफत पाणीपुरवठा करावा. शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना १० लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच आणि मुलामुलींना उच्च शिक्षणापर्यंत संपूर्ण मोफत शिक्षण द्यावे,धान खरेदी केंद्रांवरील मर्यादा (लिमिट) काढून टाकावी, वर्षभर खरेदी सुरू ठेवावी आणि विक्री केलेल्या धानाची रक्कम ७ दिवसांच्या आत खात्यावर जमा करावेत, शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी वाहन कर्ज, भारतभर मोफत एस.टी. व रेल्वे प्रवास, शेतकऱ्यांच्या शेतावर जाणाऱ्या शेतरस्त्यांची निर्मिती करावी.शासनाने १४ ऑगस्ट 2025 पर्यंत या मागण्या मान्य न केल्यास, उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी तंबी नितेश खोब्रागडे यांनी लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी नितेश खोब्रागडे व शेतकऱ्यांचे 14 ऑगस्टपासून आंदोलन
RELATED ARTICLES






