गोंदिया : महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटनेच्यावतीने 3 एप्रिलपासून ग्रेड पे वेतनाच्या मुद्याला घेऊन बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा शासनाला निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.यासंदर्भात गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांची भेट घेत 29 मार्च रोजी आंदोलन पुर्व निवेदन संघटनेच्यावतीने सादर करण्यात आले. निवेदन देतेवेळी तहसिलदार लिना फालके,तिरोडा तहसिलदार प्रशांत घोरुडे,किशोर बागडे,सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी धनंजय देशमुख, नायब तहसिलदार निखील चवरे, एन.ए.बिटले, सी.एन.वाळके, प्रकाश तिवारी, आर.एन.पालांदूरकर, आप्पासाहेब व्हनकडे,कपिल घोरपडे,सी.डी.फुंडकर, जी.आर.नागपूरे, श्री.रंगारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील महसुल विभागातील नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग -2 हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु नायब तहसिलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग -2 चे नसल्यामुळे महराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिदार संघटना यांनी नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत सन 1998 पासुन आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. तसेच या संदर्भात कोणतीही माहिती शासन स्तरावरुन अद्यापही देण्यात आलेली नाही.
संघटनेनी नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग -2 यांचे ग्रेड पे 4800/- रु. करण्याचे अनुषंगाने शासनाला यापुर्वीही बेमुदत बंदची नोटीस दिली होती. परंतू महसूल प्रशासन (महाराष्ट्र शासन) यांनी या संदर्भात कुठलीही दखल घेतलेली नाही. तत्कालीन अपर मुख्य सचिव व महसूल मंत्री व वित्तमंत्री यांचेसह झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. तथापि त्याची कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने तसेच के.पी.बक्षी यांचे अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समिती (बक्षी समिती) सक्षम नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे 4800/- वाढविण्याबाबत सादरीकरणे करुनही तसेच कामाचे स्वरुप, जबाबदारी इ. बाबींची सर्व माहिती असूनही व वारंवार देवूनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. अधिक काम अधिक वेतन या नैसर्गीक न्याय तत्वाने व शासनाच्याच धोरणानुसार सदर मागणी ही अतिशय रास्त व न्याय्य असूनही याबाबत शासन स्तरावरुन व विशेषतः महसुल विभागाकडुन नायब तहसिलदार यांचे वेतन श्रेणीबाबत न्याय मिळाला नाही. त्यामुळे तहसिलदार व नायब तहसिलदारांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाल्याने या पार्शभूमीवर महाराष्ट्र राज्य तहसिलदार, नायब तहसिलदार संघटना पदाधिकारी व सदस्यांची नाशिक मुख्यालयी 23 फेबुवारी रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत नायब तहसिलदार संघटनेच्या मागणी मान्य होईपर्यंत एकमताने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा निर्णय जाहीर करण्यात आला.त्यानुसार 03/04/2023 पासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन जाहीर करण्यात आले आहे.
3 एप्रिलापासून नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग-2 यांचे बेमुदत कामबंद आंदोलन
RELATED ARTICLES