अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची सभा
गोंदिया : 31 डिसेंबर व नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दिनांक 27 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील अवैध व्यवसाय दारु, जुगार, सट्टा, गांजा इत्यादी प्रकारच्या सर्व अवैध व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात धाड सत्र राबविण्यात येणार आहे. असे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आज येथे सांगितले.
पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्री. पिंगळे बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, औषधी निरीक्षक अभिषेक चवरडोल, मुख्य पोष्ट मास्टर अनिलकुमार कटरे, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. बी.डी. जायस्वाल, वस्तु व सेवाकर विभागाचे पी.एन.मालठाणे, उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी व्ही.डी.झाडे उपस्थित होते.
श्री. पिंगळे म्हणाले, जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या वापरावर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन व विक्री होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीने प्रभावीपणे काम करावे असे सांगून श्री. पिंगळे पुढे म्हणाले, 31 डिसेंबर व नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात डी.जे. व स्पीकर यांच्या आवाजावर तसेच ध्वनी प्रदुषणावर सुध्दा नियंत्रण ठेवून उचित कारवाई करावी. तसेच शहरात किंवा शहराबाहेर सेलीब्रेशन पार्टीमध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थांचा वापर होणार नाही यादृष्टीने फार्म हाऊस, धाबे, हॉटेल्स, लॉजिंग हे सुध्दा पोलीस विभागाच्या निगरानीमध्ये राहणार आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात कुठेही अंमली पदार्थांचे उत्पादन व विक्री होत असल्याचे आढळून आल्यास पोलीस नियंत्रण कक्ष 07182-236100 यावर फोन करुन माहिती द्यावी. सदर माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.
31 डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाची करडी नजर
RELATED ARTICLES