ग्रामपंचायतींचे अधिकार हनन करणाऱ्या निर्णयाचा सरपंचांनी केला निषेध: 28 ऑगस्ट रोजी मुंबईत धरणे आंदोलन व मोर्चा
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या आंदोलनाला ग्रामसेवक, रोजगार सेवक, संगणक परिचालक, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांचा जाहीर पाठिंबा
गोंदिया: अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे ग्रामविकास आणि ग्राम पंचायतींचे सक्षमीकरण यासाठी विविध मागण्यांना घेऊन शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील १०० टक्के ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प होते. दरम्यान ग्रामपंचायतींचे अधिकार हनन करणाऱ्या शासन निर्णयाचा सरपंच उपसरपंच यांनी निव्र निषेध केला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शासन प्रशासनाला दिला आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच ग्रामसेवक, रोजगार सेवक, संगणक परिचालक, ग्रामपंचायत कर्मचारी अशा ग्राम पंचायतशी निगडित सर्वच संघटनांचा पाठिंबा असल्याने गावगाडा ठप्प पडला असून शासनाच्या अनेक योजनांच्या अंमलबजावनीवर विपरीत परिणाम पडला आहे. शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमध्ये शेकडो सरपंचांनी एकत्रित होऊन बिडीओंना कामबंद आंदोलन सुरू केल्याचे निवेदनातून अवगत केले असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विकासाच्या बाबतीत शासनाकडून नेहमीच शहर आणि गावखेडे यात भेदभाव केला जातो यात शहरांना झुकते माप तर खेड्याकडे दुर्लक्ष केले जाते हा भेदभाव दुर करण्यात यावा, दिवसेंदिवस ग्राम पंचायतींच्या अधिकारावर कात्री चालविण्याचे प्रयत्न केले जात आहेत ते बंद करावे, रोजगार हमी योजनेची मजुरी मिळालेली नाही ती तत्काळ देण्यात यावी, कुशल कामाची देयके ३ महिन्याच्या आत देण्यात यावे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड यादीला तत्काळ मंजुरी देऊन घरे देण्यात यावी, सर्व घरकूल योजनांचे टार्गेट वाढवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक नाहीत त्यामुळे तत्काळ शिक्षक पुरविण्यात यावे, ३ लाखावरील कामे ग्राम पंचायतीला करता येणार नसल्याचा अन्यायकारक शासन निर्णय तत्काळ रद्द करून अधिकार पूर्ववत करण्यात यावे, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. शासनाच्या ग्रामपंचायत विरोधी धोरणामुळे संपूर्ण राज्यातील सरपंच एकवटले असून ग्राम पंचायतीच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी कंबर कसली आहे. केवळ कामबंद आंदोलनच नाही तर 28 रोजी मुंबईत आझाद मैदानवर धरणे आंदोलन व मंत्रालयावर मोर्चा काढण्याची सरपंच संघटनेची तयारी आहे हे विशेष. या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, विदर्भ उपाध्यक्ष महेंद्र भांडारकर, उपाध्यक्ष मनीष गहेरवार, सचिव ऍड.हेमलता चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा पटले सहित सर्व तालुकाध्यक्ष राज्य कार्यकारिणीच्या मार्गदर्शनात करत आहेत.
ग्रामपंचायतींचे अधिकार हनन सहन करणार नाही
शासनाकडून होणारे ग्रामपंचायतींचे अधिकार हनन कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही हे आजच्या १०० टक्के ग्राम पंचायत कामबंद आंदोलनातून सरपंचांनी दाखवून दिले आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या नेतृत्वात २८ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या धरणे व मोर्चा आंदोलनाला शेकडोच्या संख्येने जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ईतर कर्मचारी सहभागी होत आहेत. शासनाने तत्काळ मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा लढा अधिकच तीव्र केला जाईल.
चंद्रकुमार बहेकार, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद गोंदिया.






