गोंदिया : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय लोकसंस्कृतीचा वारसा जपणारा भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येत असून राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून तसेच आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती तर्फे हा पाच दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव येथे होणार आहे. या महोत्सवात १५० पेक्षा अधिक कलावंत सहभागी होणार असून, नृत्य, संगीत आणि कीर्तन अशा विविध कार्यक्रमांनी रंगणार अशी माहिती पत्रकार परिषदेला उपस्थित भाजप जिल्हा महामंत्री प्रशांत शहारे यांनी पत्रपरिषदेत दिली.
महोत्सवाची सुरुवात १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आशीर्वाद लॉन, सडक अर्जुनी येथे होईल. पहिल्या दिवशी पावा यांचा लाइव्ह म्यूजिक आणि मेडिटेशनचा विशेष कार्यक्रम सादर केला जाईल. दुसऱ्या दिवशी २० डिसेंबर रोजी दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषद शाळा प्रांगण, अर्जुनी मोरगाव येथे पारंपारिक नृत्य स्पर्धा होईल. २२ डिसेंबर रोजी शिवलीला पाटील यांचा सुश्रुत कीर्तनाचा कार्यक्रम रंगणार असून, महोत्सवाचा समारोप २३ डिसेंबर रोजी इंडियन आयडल फेम सवाई भट्ट यांचा लाइव्ह कॉन्सर्टने होईल. हा सोहळा भारतीय लोकसंस्कृतीचे विविध रंग उलगडणारा ठरेल. या महोत्सवात नागरिकांना सक्रिय सहभाग घेता येणार आहे. दांडिया आणि पारंपारिक नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकास ५१ हजार रुपये, द्वितीयास ४१ हजार रुपये, तृतीयास ३१ हजार रुपये तसेच पाच उत्तेजनार्थ बक्षिसे, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा महोत्सव स्थानिक कलावंतांना व्यासपीठ देऊन संस्कृतीच्या जतनाला चालना देणारा ठरेल, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमामुळे अर्जुनी मोरगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगीतप्रेमी आणि नृत्यरसिकांसाठी हा महोत्सव अविस्मरणीय ठरेल.






