गार्डन क्लब सदस्यांना आमंत्रित करुन दिली माहिती
गोंदिया : स्थानिक सुभाष गार्डनचे नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न केल्यानंतर शहराचे लोकप्रिय आमदार विनोद अग्रवाल यांनी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आत्तापर्यंत झालेल्या कामाचा आढावा व माहिती देण्यासाठी गार्डन क्लबचे सदस्य व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना आमदार विनोद अग्रवाल यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून रोहित अग्रवाल यांनी रविवार 12 रोजी सुभाष गार्डन येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सुशोभीकरण कामाची माहिती देण्यासाठी कंत्राटदार ग्रीन वर्ल्ड प्लांटेशनचे प्रतिनिधी श्रुती तुराटे व ईश्वर साखरे यांनी उपस्थितांना आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली.
बागेतील सध्याचे अडथळे दूर करून आवश्यक त्या ठिकाणी जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम पूर्ण करून पुढील प्रस्तावित कामांचा आराखडा देण्यात आला आहे. उद्यानाच्या सभोवतालच्या रस्त्यांची पातळी जास्त असल्याने उद्यानातील पाण्याचा बाह्य निचरा करण्याचे काम अत्यंत आव्हानात्मक असल्याचे सांगण्यात आले. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी क्रीडांगण, विहार, दिवाबत्ती, प्लंबिंग, स्वच्छतागृहे, कारंजे, लँडस्केप, व्यायाम क्षेत्र, योग हॉल इत्यादी सर्व कामांसाठी वेगवेगळे कंत्राटदार आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे, जेणेकरून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करता येतील. सर्व कामांसाठी आधुनिक मशिन आणि उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत. उद्यानातील विहार आणि लहान मुलांच्या खेळाच्या मैदानाला प्रथम प्राधान्य देत येत्या 50 दिवसांत ही सुविधा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गार्डन ग्रुपचे फतेहचंद खटवानी, अमोल पाटील मुंगमोडे, प्रकाश पटेल, पप्पू खामले, वासुदेव रामटेककर, पंकज शिवणकर, नरेश खेता, किशोर होतचंदानी, राजेश कारिया, बलवान ग्रुपचे प्रशिक्षक राजेश वालेछा, योगेश डोडवानी, शंकर पाठक, धीरज पाठक व उद्यान ग्रुपचे प्रमुख प्रवीण मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सुभाष गार्डनच्या नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू
RELATED ARTICLES