गोंदिया : राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करावा, हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजातील पात्र नागरिकांना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत सरकारने घेतलेला निर्णय ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. हे परिपत्रक रद्द करून ओबीसींचे आरक्षण पूर्ववत ठेवावे, या मागणीसाठी विविध ओबीसी संघटनांच्या वतीने गोंदिया येथे २१ सप्टेंबर रोजी ‘एल्गार’ महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी बांधवांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी सकल समाज संघर्ष कृती समितीने केले आहे.
शहरातील कुडवा चौकस्थित गायत्री मंदिरातून मोर्चाला दुपारी १२ वाजात सुरुवात होईल. यानंतर जयस्तंभ चौक प्रशासकीय इमारतीसमोर ओबीसी संघटनेचे पदाधिकारी आयोजित सभेत मार्गदर्शन करतील.यावेळी शासनाने काढलेला निर्णय रद्द करण्यात यावा, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, शेतकऱ्यांना खरीप हंगामातील बोनस व रबी हंगामातील धानाची रक्कम त्वरित देण्यात यावी, पोलिस व शिक्षण विभातील बिंदुनामावली नियमबाह्य तयार केल्याने ओबीसींच्या वाट्याला कमी जागा आल्याने बिंदुनामावलीची दुरुस्ती करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविण्यात येणार आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश. हा समस्त ओबीसी समाजावर अन्याय असून ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट आहे. हा हाणून पाडायचा असेल व शिक्षण, नोकरीत आरक्षणासाठी प्रत्येक एका ओबीसी कुटुंबातील एका व्यक्तीने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सकल ओबीसी समितीने केले आहे.
ओबीसी सकल समाजाचा गोंदियात रविवारला महामोर्चा
RELATED ARTICLES






