देवरीच्या ग्रामीण रुग्णालयातील प्रकार : डॉ. उर्वशी येडे यांचेसह इतर कर्मचाऱ्यांवर झाली कार्यवाही
गोंदिया : अज्ञात कीड्याने चावल्यामुळे देवरीच्या ग्रामीण रुग्णलयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा करीत योग्य उपचार न केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केल्यामुळे रुग्णालयात चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. संबंधित डॉक्टर यांच्या निलंबनाची मागणी या प्रकरणामुळे समोर आली आहे. दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक यांनी डॉ उर्वशी येडे यांचेसह दोन अधिपरिचारिकांवर कार्यमुक्तीची कार्यवाहीचे पत्र दिले आहे. मृताचे नाव देवराम नारायण गावळ (वय५५) राहणार पालांदूर जमी, तालुका देवरी असे आहे.
या प्रकरणात रुग्णावर वेळेवर योग्य उपचार केल्या गेला असता तर रुग्णाचा जीव गेला नसता. या प्रकरणात जबाबदार डॉक्टरला निलंबित करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.
देवराम गावळ यांच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबरदार : नयेंद्र रामदास गावळ
माझे काका देवराम यांना मध्यरात्री एका अज्ञात कीड्याने कानाला दंश केल्यामुळे त्यांना सकाळी आम्ही देवरी येथे उपचारासाठी आणले. प्रथम डॉ. येळे यांच्या दवाखान्यात उपचार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काका यांना ग्रामीण रुग्णालयात सुमारे सहा-साडेसहा दरम्याने दाखल केले. यावेळी येथे डॉक्टर उपस्थित नव्हते. काही वेळीने डॉक्टर पोचले. डॉक्टरांनी माझ्या काकांचा उपचार गांभीर्याने केला नाही. रुग्णाचे कानाला कीडा चावल्याचे डॉक्टरांना सांगितले. नंतर रुग्णाला छातीत दुखायला लागल्याने व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. येथे उपचार योग्य होत नसल्याचे पाहून आम्ही गोंदियाला रेफर करण्याची विनंती केली. पण डॉक्टरांनी आमची विनंती धुडकावून लावली. शेवटी मृत्यूच्या २-३ मिनिटे अगोदर गोंदियाला नेण्याची सूचना केली.पण काहीच मिनिटांमध्ये रुग्णाने जीव सोडला. याला जबाबदार रुग्णालयातील कर्मचारी आहेत. त्यांच्यावर कार्यवाही व्हावी आणि डॉक्टरांचे निलंबण व्हावे, अशी आमची मागणी आहे.
रुग्णाची प्रकृती स्थिर होती : डॉ. अमित येडे
सकाळी सुमारे सहाच्या दरम्यान पालांदूरवरून देवराम गावळ हा रुग्ण माझ्या दवाखान्यात उपचारासाठी आला. त्याने कीडा चावल्याने कानावर सूज आल्याची तक्रार केली. मी त्याच्यावर प्राथमिक उपचार केला. रुग्णाला निगराणी खाली ठेवण्याची गरज असल्याचे माझे मत झाल्याने मी रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. रुग्णाची प्रकृती एकदम स्थिर होती. त्याला इतर कोणताही त्रास होत नसल्याचे माझे तपासणीत दिसून आले होते.
रुग्ण दगावल्याची सूचना पोलिसांनी दिली : डॉ अन्सारी
पालांदूर जमी येथील देवराम गावळ हा रुग्णालयात सकाळी दाखल करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. उर्वशी येडे या कर्तव्यावर होत्या. रुग्णाची प्रकृती भरती करतेवेळी स्थिर होती, असे दिसून येते. रुग्णाचा मृत्यू हा सकाळी ११.१० वाजे झाला. याची सूचना आम्ही रुग्णांचे नातेवाईक आणि पोलिसांनी दिली.






